Join us

आता ATM मधून पैसे काढणे पडणार महागात? RBI कडून एटीएम इंटरचेंज शुल्क वाढण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:43 IST

जर शुल्कात वाढ झाली तर ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील.

नवी दिल्ली : जर तुम्ही एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढण्याची शक्यता आहे. बँकांद्वारे ५ मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून जास्त शुल्क आणि एटीएम इंटरचेंज शुल्क वाढवण्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) योजना आखत आहे. 

हिंदू बिझनेसलाइनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, जर शुल्कात वाढ झाली तर ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ५ मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर कमाल रोख व्यवहार शुल्क हे सध्याच्या २१ रुपये प्रति व्यवहारावरून २२ रुपये वाढवण्याची शिफारस केली आहे. 

याचबरोबर, पेमेंट्स रेग्युलेटर एनपीसीआयने उद्योगांशी सल्लामसलत केल्यानंतर रोख व्यवहारांसाठी एटीएम इंटरचेंज शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपये करण्याची शिफारस केली आहे. रोख नसलेल्या व्यवहारांसाठी शुल्क ६ रुपयांवरून ७ रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

एटीएम इंटरचेंज शुल्क म्हणजे एटीएम सेवा वापरण्यासाठी एक बँक दुसऱ्या बँकेला देणारा शुल्क. हे शुल्क सहसा व्यवहाराच्या टक्केवारीवर असते आणि बहुतेकदा ग्राहकांच्या बिलात जोडले जाते. दरम्यान, मेट्रो आणि नॉन-मेट्रो क्षेत्रांसाठी शुल्क वाढवण्याच्या एनपीसीआयच्या योजनेशी बँका आणि व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर सहमत आहेत. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआयने याला अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचे समजते.

टॅग्स :एटीएमव्यवसाय