Join us  

Wipro च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, एका वर्षाच्या उच्चांकी स्तरावर; २६९४ कोटींचा झाला नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:23 AM

आघाडीची आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी दिसून आली.

आघाडीची आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी दिसून आली. विप्रोचे शेअर्स सोमवारी 13 टक्क्यांनी वाढून 526.45 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सनं एका वर्षाचा नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. विप्रो शेअर्समध्ये ही वाढ डिसेंबर 2023 च्या तिमाही निकालानंतर झाली आहे. कंपनीच्या निकालांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. कंपनीची अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्ट (ADR) 18 टक्क्यांनी वाढून 6.35 डॉलर्स झाली आहे, जी जवळपास 20 महिन्यांतील सर्वाधिक आहे.

10 महिन्यांत कमालीची वाढ

गेल्या 10 महिन्यांत विप्रोच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या 10 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 28 मार्च 2023 रोजी विप्रोचे शेअर्स 356.30 रुपयांवर होते. 15 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 526.45 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, विप्रोचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 415.25 रुपयांवरून 526.45 रुपयांवर पोहोचले. विप्रोच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 351.85 रुपये आहे.

निव्वळ नफा घसरला

आयटी कंपनी विप्रोनं चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 2694.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे 12 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 3052.9 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. दरम्यान, सप्टेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत विप्रोच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत विप्रोला 2646.3 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याच वेळी, कंपनीचा महसूल 22205.1 कोटी रुपयांवर घसरला, जो गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत 23290 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 22515.9 कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विप्रोशेअर बाजार