कोरोना महासाथीने जगात अनेक बदल घडवून आणले. त्यातलाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे कार्यालयीन कामकाजाचे स्वरूप. घरूनच काम करा (वर्क फ्रॉम होम) ही एक नवीन संकल्पना उदयाला आली. आधी ती आयटी क्षेत्रापुरती मर्यादित होती. मात्र, महासाथीच्या काळात तिचा परिघ वाढला. आता तर कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचा नवा ट्रेण्ड सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
काय सांगतो ट्रेण्ड?
०६ महिन्यांत ३२ लाख तरुणांनी वेगवेगळ्या मंचांच्या माध्यमातून रोजगाराचा शोध घेतला. ५७% तरुणांनी कायमस्वरूपी घरून काम करण्याच्या पर्यायाला प्राधान्य दिले. तरुणांना नोकरी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या एका संकेतस्थळाने सादर केलेल्या एका विशेष लेखातही हाच ट्रेण्ड आढळून आला. ९३हजार तरुणांनी नोकरीसाठी या संकेतस्थळावर सर्च केला. त्यापैकी२२ टक्के तरुणांनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम आवडेल, असे स्पष्ट केले.
कोरोनाचा परिणाम?
या बदलत्या ट्रेण्डला अर्थातच कोरोना कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अनेक खासगी संस्थाही खर्चात बचत करण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत.वैयक्तिकरित्या योगदान असलेल्यांची गरज अधिक असल्याने कंपन्या, त्यात आयटी, सॉफ्टवेअर आणि बीपीओ यांचा समावेश अधिक, हा पर्याय देत असल्याचे निष्पन्न होत आहे.
तीन पर्याय उपलब्ध
नियमित नोकरी, तात्पुरत्या स्वरूपात घरून काम आणि कायमस्वरूपी घरून काम. मध्यम व लहान आकाराच्या कंपन्या हे ३ पर्याय उमेदवारांना देतात. आयटी, सॉफ्टवेअर आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपन्या कायमस्वरूपी घरून काम करणाऱ्यांना प्राधान्य देत असल्याचे डेटा दर्शवतो. ॲमेझॉन, एचसीएल, टेक महिंद्रा, फ्लिपकार्ट, डेलॉइट, ओरॅकल यांसारख्या कंपन्या तात्पुरत्या आणि कायम अशा दोन्ही स्वरूपातील वर्क फ्रॉम होमचे पर्याय उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास आले आहे.