स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संकेतांनुसार केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्व निर्णय घेत अनेक जीवनावश्यक आणि दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी घटवण्याचा निर्णय घेतला होता. जीएसटीमध्ये झालेल्या या कपातीचा लाभ २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना मिळणार आहे. तसेच अनेक कंपन्यांनीही आपल्या वस्तूंच्या किंमती घटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचदरम्यान, ५, १०, २० रुपये किंमत असलेल्या बिस्किटे, वेफर्स, चिप्स यांचे मूल्यही घटणार की जैसे थे राहणार याबाबत ग्राहकांच्या मनात उत्सुकता आहे. त्याबाबत आता एफएमसीजी कंपन्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
एफएमसीजी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटीमध्ये कपात झाली तरी ५ रुपयांचं बिस्किट,१० रुपयांचा साबण आणि २० रुपये किंमत असलेल्या टुथपेस्टसारख्या कमी मूल्य असलेल्या उत्पादनांची किंमत कमी करता येणार नाही. ग्राहकांना या वस्तूंच्या निश्चित किमतीची सवय झालेली आहे. तसेच किंमत घटवून ती १८ किंवा ९ रुपयांसारख्या आकड्यांवर नेल्यास त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडू शकतो. तसेच पैशांच्या देवाणघेवाणीबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे किमती घटवण्याऐवजी कंपन्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाला (सीबीआयसी) सांगितले की, आम्ही किंमती त्याच ठेवू मात्र पाकिटामधील वस्तूंचं प्रमाण वाढवू. उदाहरणार्थ २० रुपयांचया बिस्किटाच्या पुड्यामध्ये आता त्याच किमतीत अधिक ग्रॅम बिस्किटं मिळतील. पाकिटातील वस्तूचं प्रमाण वाढवल्याने जीएसटीमधील कपातीचा लाभ ग्राहकांना मिळेल, असा कंपन्यांचा दावा आहे.
दरम्यान, वित्त मंत्रालयाचे अधिकारी जीएसटीमधील कपातीचा लाभ ग्राहकांना मिळण्यासाठी कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत. तसेच जीएसटीमधील कपातीमुळे होणाऱ्या बचतीचा लाभ कंपन्या स्वत:च्या खिशात न घालता ग्राहकांना मिळवून देतील, याकडे लक्ष दिलं जात आहे.