Join us

या आठवड्यात बाजारामुळे गुंतवणूकदार श्रीमंत होणार?; सगळ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 09:43 IST

शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा तोटा सुरूच आहे.

प्रसाद गो. जोशीगेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली अस्थिरता आगामी सप्ताहामध्येही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्याजदरात वाढ होण्याचे करण्यात आलेले सूतोवाच हे परकीय वित्तसंस्थांना बाजारातून पैसे काढून घेण्यास प्रवृत्त करणारे आहे. अन्य आस्थापनांचे येणारे निकाल आणि इंधनाच्या दरामधील वाढ अथवा घट या कारणांनी बाजारात हालचाल होऊ शकते.गतसप्ताहामध्येही शेअर बाजारामध्ये सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली. परकीय वित्त संस्थांकडून बाजारातून रक्कम काढून घेणे सुरूच आहे. विविध कंपन्यांचे आलेले निकाल बाजाराला समाधानकारक न वाटल्याने त्यामुळेही बाजार वाढू शकला नाही.

शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा तोटा सुरूच आहे. शुक्रवार अखेरीस बाजारातील एकूण कंपन्यांची भांडवलमूल्य २,६९,६२,७५४.६४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील भांडवलमूल्याशी तुलना करता या सप्ताहामध्ये २,४०,३०८.९३ कोटी रुपयांनी हे मूल्य कमी झाले आहे. याआधीच्या सप्ताहामध्येही या मूल्यामध्ये २.०७ लाख कोटी रुपयांनी घटच झाली हाेती. 

विदेशी गुंतवणूकदारांची नाराजी कायमदरम्यान एप्रिल महिन्यात आतापर्यंत परकीय वित्त संस्थांनी शेअर बाजारामधून १२,२८६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. अमेरिकेमधील व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे परकीय वित्त संस्थांकडून मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारातून रक्कम काढून घेतली जात होती. त्याचबरोबर चलनवाढीचा चढता दर आणि युद्धामुळे इंधनाच्या मूल्यामध्ये सातत्याने होणारी वाढ या कारणांमुळेही परकीय संस्था येथून रक्कम काढून घेताना दिसत आहेत.