Join us  

४ जून नंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना झटका देणार? रिचार्जमध्ये होऊ शकते 'इतकी' वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 9:28 AM

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइलचं रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइलचं रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांनंतर टेलिकॉम कंपन्या रिचार्जमध्ये १५ ते १७ टक्क्यांनी वाढ करू शकतात, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.  

देशात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या रिपोर्टनुसार, या क्षेत्रातील ही दरवाढ नजीक आली असून भारती एअरटेलला सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. “निवडणुकीनंतर टेलिकॉम क्षेत्रातील उद्योग १५-१७ टक्क्यांनी शुल्क वाढवेल,” असं अहवालात म्हटलं आहे.  

डिसेंबर २०२१ मध्ये अखेरची वाढ 

गेल्या वेळी डिसेंबर २०२१ मध्ये टॅरिफमध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. दरम्यान, याबाबत या अहवालात नमूद करण्यात आलंय. भारती एअरटेलचा ARPU आर्थिक वर्ष २७ च्या अखेरीस २८६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तो सध्या २०८ रुपये आहे, असं यात म्हटलंय.   

यामध्ये, टॅरिफ वाढीसाठी ५५ रुपये आणि 4G मध्ये अपग्रेड करू इच्छिणाऱ्या 2G ग्राहकांसाठी १० रुपयांचं योगदान द्यावं लागेल. याशिवाय, मोठा डेटा प्लॅन्स (दोन्ही 4G आणि 5G) आणि पोस्टपेड डिलिव्हरीमध्ये अपग्रेडमध्ये १४ रुपयांची वाढ होईल. उद्योगाच्या वार्षिक वाढीच्या एक टक्क्यांच्या तुलनेत भारती एअरटेलचा ग्राहकवर्ग दरवर्षी सुमारे दोन टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, असं अहवालात म्हटलंय. 

व्होडाफोनचा हिस्सा कमी झाला 

व्होडाफोन आयडियाचा बाजारातील हिस्सा सप्टेंबर २०१८ मध्ये ३७.२ टक्के होता. जो डिसेंबर २०२३ मध्ये जवळपास निम्म्या म्हणजे १९.३ टक्क्यांवर घसरला आहे. या कालावधीत भारती एअरटेलचा बाजार हिस्सा २९.४ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर पोहोचलाय. या कालावधीत जिओचा बाजारातील हिस्सा २१.६ टक्क्यांवरून ३९.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :एअरटेलरिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)