गेल्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. आता कच्चं तेल ६१ डॉलरवर आलंय. ब्लूमबर्गनुसार, जुलै २०२५ साठी ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.६१% घसरून ६०.६९ डॉलर प्रति बॅरल झाला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड जून २०२५ च्या कॉन्ट्रॅक्टसाठी आता ५७.७३ डॉलर प्रति बॅरलवर आहे. एक दिवसापूर्वी आलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याच्या आणि सौदी अरेबिया तेलपुरवठा वाढवणार असल्याच्या अटकळांमुळे मोठी घसरण झाली होती. जागतिक स्तरावर हीच पातळी कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
"कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी घसरणीचा धोका आहे. मागणी कमी होण्याने आणि पुरवठा वाढल्यानं ब्रेंट क्रुड ५५ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतं," अशी प्रतिक्रिया नवी दिल्लीतील रिसर्च फर्म वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा यांनी दिली.
केव्हा मिळू शकतो दिलासा?
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ८४.४९ डॉलर असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते, तेल कंपन्या सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर १० ते १२ रुपये नफा कमावत आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार किरकोळ दरात कपात करण्यात आलेली नाही.
८ एप्रिल रोजी आयओसीनं पेट्रोलची बेस प्राईज ५४.८४ रुपयांवरून ५२.८४ रुपये केली होती, परंतु सरकारनं उत्पादन शुल्क वाढवून २ रुपयांचा फायदा घेतला. दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७,६७ रुपये प्रति लिटर होते. जागतिक स्तरावर हीच पातळी कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण का होतेय?
ट्रम्प यांच्या शुल्कापूर्वी आयात वाढल्यानं पहिल्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था तीन वर्षांत प्रथमच कमकुवत झाली. रॉयटर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांच्या शुल्क धोरणांमुळे जागतिक मंदीचा धोका वाढला आहे.
अमेरिकेच्या कच्च्या तेल साठ्यात घट
अमेरिकेच्या ऊर्जा विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा साठा २७ लाख बॅरलनं कमी झाला, तर तज्ज्ञांना ४२ लाख ९० हजार बॅरलची वाढ अपेक्षित होती. रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया पुरवठा कपातीसह कच्च्या तेलाच्या बाजाराला पाठिंबा देण्यास तयार नाही आणि बराच काळ कमी किंमती सहन करू शकतो. याव्यतिरिक्त, काही ओपेक + सदस्य जूनमध्ये कच्च्या तेलाचं उत्पादन वाढविण्याची सूचना करू शकतात. ५ मे रोजी होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे.