Join us  

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळणार बसण्याचा अधिकार, सतत उभे राहण्याने निर्माण होतो आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:29 AM

Employees News: दुकानांमध्ये तासनतास उभे राहून काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांना कामादरम्यान बसण्याचा हक्क तामिळनाडू सरकारने एका कायद्याद्वारे बहाल केला आहे.

चेन्नई : दुकानांमध्ये तासनतास उभे राहून काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांना कामादरम्यान बसण्याचा हक्क तामिळनाडू सरकारने एका कायद्याद्वारे बहाल केला आहे. सतत उभे राहून काम केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोकाही आता कमी होणार आहे. असा कायदा करणारे तामिळनाडू हे देशातले दुसरे राज्य ठरले आहे. २०१८ साली केरळने असा कायदा संमत केला होता.

विविध ठिकाणचे मॉल, सोन्या चांदीच्या, कापडाच्या दुकानांत महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या दिल्या जातात. त्यांना कामाच्या वेळेमध्ये सतत उभे राहावे लागत असे. त्यांना बसण्याची परवानगी नसे. कार्यालयीन वेळेत फक्त २०  मिनिटे जेवणासाठी देण्यात येतात. त्या काळात जी थोडीफार विश्रांती मिळते तोच या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा असायचा. त्यामुळे कामादरम्यान बसण्याचा हक्क मिळावा यासाठी केरळप्रमाणे तामिळनाडूनेही कायदा करावा अशी कामगार संघटनांची मागणी होती.

दुकानांत सतत उभे राहून काम करावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यामुळे काही वर्षांनी पायाची, कंबरेची दुखणी सुरू होतात. देशामध्ये किरकोळ विक्री क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नातील १० टक्के उत्पन्न हे या क्षेत्रामुळे मिळते. देशातील एकूण नोकऱ्यांमध्ये किरकोळ विक्री क्षेत्रातील नोकऱ्यांचा वाटा ८ टक्के आहे. तामिळनाडूमध्ये सोन्या-चांदीच्या व कापड दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचारी असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता कामादरम्यान बसण्याचा हक्क प्रदान करणारा कायदा आवश्यक होता असे महिला कर्मचारी समन्वय समितीच्या तामिळनाडूच्या निमंत्रक एम. धनलक्ष्मी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) 

बारा ते चौदा तास कार्यमग्नघरातून कामाच्या ठिकाणी येणे व परत येणे तसेच कामाचे आठ तास असे दिवसातले सुमारे १२ ते १४ तास महिला कार्यरत असतात. त्या कालावधीत त्यांना क्वचित बसण्याची संधी मिळते. सतत उभे राहिल्याने या महिलांना व्हेरिकोज व्हेन्सच्या आजाराचा त्रास होण्याची शक्यता वाढते. या आजारात पायाच्या नसांत रक्ताच्या गुठळ्या होतात व पायांना सूज येते.

टॅग्स :कर्मचारीतामिळनाडूकेरळ