लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘ग्लोबल पब्लिक ओपिनियन ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ नावाच्या एका सर्वेक्षणानुसार, जगातील ५४% लोकांना वाटते की पुढील १० वर्षांत त्यांची नोकरी एआय किंवा मशीनमुळे धोक्यात येऊ शकते. विशेषतः भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये लोकांना याची जास्त भीती आहे.
विकसनशील देशांमध्ये भीती जास्त
भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये ‘होय’ असे उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात ७५% (३६% ३९%) लोकांना वाटते की, एआयमुळे त्यांची नोकरी धोक्यात येईल. पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७२% आणि इंडोनेशियामध्ये ७६% आहे. याचे कारण असे असू शकते की, या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये कमी कौशल्याची कामे जास्त असून ती एआयमुळे स्वयंचलित होण्याची शक्यता जास्त आहे.
विकसित देशांत कमी चिंता
जर्मनी, जपान, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांमध्ये एआयमुळे नोकरी जाण्याची भीती कमी असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. जपानमध्ये 'नक्कीच होय' असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी, केवळ ५% आहे, तर जर्मनीमध्ये 'नक्कीच नाही' म्हणणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक (३४%) आहे. याउलट, फ्रान्समध्ये ४१% लोकांना आपली नोकरी एआयघेईल असे वाटते, तर पोर्तुगालमध्येही 'होय' म्हणणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
या देशांमध्ये नोकरी जाण्याची भीती कमी असण्यामागे कदाचित मजबूत कामगार कायदे किंवा एआयच्या कमी वापराची कारणे असू शकतात. तसेच, मानवी संवादाच्या नोकऱ्या एआयमुळे कमी धोक्यात येतात, असेही काही संशोधनातून समोर आले आहे.