Join us

अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:37 IST

Adani group news: ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी आघाडीवर असून त्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे. अदानी समूहाची बोली १२,५०० कोटी रुपयांची आहे. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत ३ रुपये आहे.

Adani group news: अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह जयप्रकाश असोसिएट्सच्या अधिग्रहणाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, जयप्रकाश असोसिएट्स विकत घेण्याच्या शर्यतीत अदानींनी सर्वाधिक बोली लावली आहे. अदानी समूहाची बोली १२,५०० कोटी रुपयांची आहे. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत ३ रुपये आहे. शेअर्सचे ट्रेडिंग बऱ्याच दिवसांपासून बंद आहे.

या कंपन्याही शर्यतीत

अदानी समूहाव्यतिरिक्त जयप्रकाश असोसिएट्सच्या संभाव्य खरेदीदारांच्या यादीत अनिल अग्रवाल यांची वेदांता, जेएसपीएल (नवीन जिंदाल), दालमिया भारत सिमेंट आणि पीएनसी इन्फ्राटेक यांचाही समावेश आहे.

ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी

आर्थिक संकटात सापडलेल्या पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट कंपनी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (जेएएल) दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) अलाहाबाद खंडपीठाच्या ३ जून २०२४ च्या आदेशाद्वारे कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेत (सीआयआरपी) कंपनीला मान्यता देण्यात आली. समूहाने कर्जाची देयकं चुकवल्यानंतर जेएएलला दिवाळखोरीच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलं होतं. बँका तब्बल ५७ हजार १८५ कोटी रुपयांचे दावे करत आहेत.

जयप्रकाश असोसिएट्सचे साम्राज्य

जयप्रकाश असोसिएट्सचे रिअल इस्टेटचे मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये ग्रेटर नोएडामधील जेपी ग्रीन्स, नोएडामधील जेपी ग्रीन्स, आगामी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सामरिकदृष्ट्या वसलेलं जेपी इंटरनॅशनल स्पोर्ट्स सिटी यांचा समावेश आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तीन व्यावसायिक/औद्योगिक कार्यालये असून हॉटेल विभाग, तसंच दिल्ली-एनसीआर, मसूरी आणि आग्रा येथे पाच मालमत्ता आहेत. जयप्रकाश असोसिएट्सचे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये चार सिमेंट कारखाने आहेत आणि मध्य प्रदेशात काही भाडेतत्त्वावरील चुनखडीच्या खाणी आहेत. मात्र, सिमेंट कारखाने सुरू नाहीत.

टॅग्स :अदानीगौतम अदानी