Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार पडलेला असताना SIP बंद करणं हा गुंतवणूकदारांचा सगळ्यात महागात पडणारा निर्णय का ठरतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:41 IST

डिसेंबर 2023 मध्ये, भारतातल्या निफ्टी 50 इंडेक्सने पहिल्यांदाच 21731 चा नवा उच्चांक गाठला होता आणि त्या महिन्यात तो 21801 च्या पातळीला पोहोचला होता. मार्च 2026 च्या शेवटी, आपण आता त्याच पातळीच्या खूप जवळ आहोत.

निमेश चंदन, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, बजाज फिनसर्व्ह एएमसी

डिसेंबर 2023 मध्ये, भारतातल्या निफ्टी 50 इंडेक्सने पहिल्यांदाच 21731 चा नवा उच्चांक गाठला होता आणि त्या महिन्यात तो 21801 च्या पातळीला पोहोचला होता. मार्च 2026 च्या शेवटी, आपण आता त्याच पातळीच्या खूप जवळ आहोत. बरेच शेअर्स, खास करून मोठ्या बाजारपेठेतले, अजूनही डिसेंबर 2023 च्या पातळीच्या खालीच आहेत.

बाजारात काय चर्चा सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या काही मित्रांशी बोललो, जे 2000 च्या सुरुवातीपासून व्यावसायिकरीत्या पद्धतीने गुंतवणूक करत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच होतं: "हा बाजार नेमका कुठे खाली जाऊन थांबेल हे मला माहीत नाही. मी याआधी असं कधीच पाहिलं नाहीये " बाजार जेव्हा सुरुवातीला पडायला लागला, तेव्हा घसरणीचा फायदा घेण्याची ज्यांची इच्छा होती, त्यांनी आता आपले मत बदलले आहे आणि पैसे गुंतवण्यापूर्वी त्यांना अजून थोडा वेळ थांबायचं आहे.

त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मला प्रश्न पडला की, ज्यांनी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केली आहे, त्यांनी असं काही आधी पाहिलं कसं नाही? गेल्या दोन दशकांमध्ये बाजारात खूप चढ-उतार आणि मोठी घसरण झाली आहे. नक्कीच त्यांनी गेल्या शतकात बाजार कशा प्रकारे कोसळला होता, याबद्दलही वाचलं असेलच. मला मान्य आहे की ही घसरण हुबेहूब आधीसारखी नसेल, पण मार्क ट्वेनने म्हटल्याप्रमाणे, "इतिहास स्वतःला तसाच दोहरवत नाही, पण तो त्याच्याशी मिळताजुळता नक्कीच असतो."

बाजारामध्ये मोठा परतावा मिळवण्यासाठी, जेव्हा दुसरे लोक घाबरलेले असतात तेव्हा एका हुशार गुंतवणूकदाराने लोभी असायला हवं. पण एका हुशार गुंतवणूकदाराने जे करायला हवं, ते करण्यापासून आपल्याला नेमकं काय रोखतं? या घसरणीचा फायदा घेण्यापासून जे अडथळे आपल्याला मागे खेचतात, ते म्हणजे 'मायोपिक लॉस अव्हर्जन' आणि 'रिसन्सी बायस' आहेत.

या लेखामध्ये, मी एका अशा मानसिक विषयावर बोलणार आहे ज्याचा परिणाम अगदी मोठ्या अनुभवी गुंतवणूकदारांवर सुद्धा होतो. लोकांना असं का वाटतं की "यावेळी काहीतरी वेगळं आहे", हे समजावून सांगण्यासाठी मी नोबेल पुरस्कार विजेते डॅनियल काहनेमन यांच्या 'टू सेल्स' या संकल्पनेवर आधारित एक विचार मांडला आहे.

टू सेल्स

काहनेमन हे अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या 'थिंकिंग, फास्ट अँड स्लो' या पुस्तकात ते सांगतात की प्रत्येकामध्ये दोन स्वभाव असतात—एक 'आठवणी जपणारा' आणि दुसरा 'अनुभव घेणारा'. ते हे एका उदाहरणाने समजावून सांगतात. त्यांच्या एका विद्यार्थ्याने लेक्चर संपल्यावर त्यांच्याकडे येऊन तो ऐकत असलेल्या एका वाद्यांच्या संगीताबद्दल सांगितलं. "ते संगीत खूपच अफाट होतं, पण रेकॉर्डिंगच्या अगदी शेवटी एक भयंकर कर्कश आवाज आला." आणि मग तो भावूक होऊन म्हणाला, "त्यामुळे माझा पूर्ण अनुभवच खराब झाला." काहनेमन यांच्या मते, त्या विद्यार्थ्याचा अनुभव खराब झाला नव्हता, तर त्या अनुभवाची आठवण खराब झाली होती. जरी त्या विद्यार्थ्याने त्या 20 मिनिटांच्या चांगल्या संगीताचा आनंद घेतला होता, तरी त्या अनुभवाला काहीच महत्व उरले नाही कारण त्याच्या मनात फक्त एक वाईट आठवण शिल्लक राहिली. 'अनुभव घेणारा स्वभाव' हा वर्तमानात जगतो. जेव्हा डॉक्टर विचारतात, "आता दुखतंय का?", तेव्हा ते याच स्वभावाशी बोलत असतात. 'आठवणी जपणारा स्वभाव' हा सगळा हिशोब ठेवतो आणि आपल्या आयुष्याची गोष्ट तयार करतो. जेव्हा डॉक्टर विचारतात, "गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला कसं वाटतंय?", तेव्हा हाच स्वभाव उत्तर देतो. 'अनुभव घेणारा स्वभाव' प्रत्येक क्षण जगत असतो, पण ते सगळेच अनुभव आठवणीत राहत नाहीत. 'आठवणी जपणारा स्वभाव' हा गोष्टी सांगणाऱ्यासारखा असतो आणि आपल्या अनुभवांतून आपण जे काही मिळवतो, ते तो जपून ठेवतो.

या ‘टू सेल्स’संकल्पना अनेक ठिकाणी लागू होते. शस्त्रक्रिया झाल्यावर जर शेवटच्या काळात वेदना कमी झाल्या, तर रुग्णांच्या मनात त्याबद्दल चांगल्या आठवणी राहतात; पण जर शेवटी खूप जास्त त्रास झाला, तर आठवणी वाईट उरतात. मुलांच्या संगोपनाचंच उदाहरण घ्या: पालकांच्या मनात आपल्या मुलांना लहानाचं मोठं करण्याच्या खूप चांगल्या आठवणी असतात. पण प्रत्यक्षात त्यांना वाढवतानाचा जो रोजचा अनुभव असतो, तो मात्र नेहमीच खूप सुखद असतो असं नाही. सहलीचं किंवा सुट्ट्यांचंच बघा ना. तुमची सहल खूप छान झाली, पण शेवटी जर तुमचा पासपोर्ट आणि पाकीट हरवलं, तर तुमचा 'आठवणी जपणारा स्वभाव' त्या संपूर्ण सहलीची एक दुःखद गोष्टच मनात तयार करेल.

या सगळ्याचा बाजाराशी काय संबंध?

माझा असा एक तर्क आहे: अनेक गुंतवणूकदारांनी याआधीही बाजारातली मोठी घसरण पाहिलेली असते. त्यांच्या मनात अशा आठवणी असतात की संकटकाळ ही शेअर बाजारात गुंतवणूक वाढवण्याची मोठी संधी असते, आणि जेव्हा बाजार पुन्हा वर येतो, तेव्हा त्यातून चांगला परतावा मिळतो. जेव्हा जेव्हा बाजार पुन्हा पडायला लागतो, तेव्हा या गुंतवणूकदारांना त्याच जुन्या आठवणी येतात. त्यांचा 'आठवणी जपणारा स्वभाव' त्यांना हीच गोष्ट सांगतो की वाईट काळात केलेली गुंतवणूक किती फायद्याची ठरते. पण, या 'आठवणी जपणार्‍या स्वभावाने' भूतकाळातले सगळेच क्षण काही साठवून ठेवलेले नसतात. जो 'अनुभव घेणारा स्वभाव' असतो, त्याने त्या घसरणीच्या काळातली भीती, अस्वस्थता आणि लोकांच्या विरोधात जाऊन गुंतवणूक करताना होणारा तो सगळा त्रास सहन केलेला असतो. पण यातले बहुतेक क्षण आपण विसरून जातो आणि आपल्या गोष्टीत फक्त तो चांगला शेवटच शिल्लक राहतो.

सध्याच्या बाजारातल्या घसरणीच्या काळात, 'अनुभव घेणारा स्वभाव' प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा तो त्रास रोज प्रत्यक्षात सहन करतोय. आणि घसरण सुरू झाल्याच्या काही दिवसांतच आपल्याला वाटू लागतं की आपला 'आठवणी जपणारा स्वभाव' जी गोष्ट सांगत होता, त्यापेक्षा यावेळी सगळं काही वेगळं आहे. "यावेळी काहीतरी वेगळं आहे!" जरी प्रत्येक मोठ्या घसरणीच्या वेळी गुंतवणूकदारांना त्याच भीती आणि त्रासातून जावं लागतं, तरीही ही गोष्ट त्यांना वेगळी वाटते. त्यांना असं वाटतं की मागच्या वेळी परिस्थिती यापेक्षा बरी होती. हेच सूत्र बाजार जेव्हा खूप तेजीत असतो, तेव्हाही लागू होतं. जरी गुंतवणूकदारांच्या मनात जुन्या तेजीच्या बुडबुड्यांमध्ये अडकल्याच्या जखमा ताज्या असल्या, तरी "यावेळी काहीतरी वेगळं आहे" याच एका वाक्यामुळे ते पुन्हा एका नव्या जाळ्यात ओढले जातात.

दर काही वर्षांनी बाजारात घसरण होते आणि भीती किंवा घाबरल्यामुळे बरेच गुंतवणूकदार अगदी खालच्या पातळीला आपले शेअर्स विकून बसतात. बाजाराचा लंबक पूर्णपणे टोकाच्या निराशेच्या बाजूला झुकतो. जर आपली वृत्ती योग्य असेल, तर एक हुशार गुंतवणूकदार या चक्रांचा फायदा घेऊ शकतो. हे खरं आहे की, बाजार नक्की कधी सगळ्यात खाली किंवा सगळ्यात वर असेल, हे कोणालाच अचूक पकडता येत नाही. अशा वेळी एसआयपी किंवा एसटीपी द्वारे टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक, जवळच्या काळातल्या चढ-उताराची जोखीम कमी करायला मदत करते आणि आपण बाजाराच्या प्रत्येक चक्रात सहभागी राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Why stopping SIP during market downturns proves a costly mistake?

Web Summary : Stopping SIPs when markets fall can be a costly error. Investors often succumb to fear and short-sightedness, ignoring historical trends. Smart investing means being greedy when others are fearful. Consistent investment strategies like SIPs mitigate risk and ensure market participation.