Join us

कोण आहेत सीमा सिंग; ज्यांनी मुंबईतील वरळीत खरेदी केलं १८५ कोटींचं पेंटहाऊस, काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 10:31 IST

मुंबईसारख्या शहरात आलिशान आणि मोठं घर विकत घेणं सोपं काम नाही. पण सीमा सिंग यांनी मुंबईतील पॉश भागात एक आलिशान पेंटहाऊस विकत घेतलंय. सध्या याची बरीच चर्चा सुरू आहे.

मुंबईसारख्या शहरात आलिशान आणि मोठं घर विकत घेणं सोपं काम नाही. पण सीमा सिंग यांनी मुंबईतील पॉश भागात एक आलिशान पेंटहाऊस विकत घेतलंय. सध्या याची बरीच चर्चा सुरू आहे. मुंबईतील वरळीमध्ये शेकडो कोटी रुपयांचं घर विकत घेणाऱ्या सीमा सिंह कोण आहेत, त्या काय करतात, जाणून घेऊ.

मुंबईतील वरळी भागात लोढा सी-फेस प्रोजेक्टच्या ए-विंगच्या ३० व्या मजल्यावर बांधलेलं आलिशान पेंटहाऊस सीमा सिंग यांनी विकत घेतलंय. या पेंटहाऊसची एकूण किंमत १८५ कोटी रुपये आहे. भव्यता आणि सोयीसुविधांमुळे हे पेंट हाऊस चर्चेचा विषय ठरत आहे. या मालमत्तेचे क्षेत्रफळ १४ हजार ८६६ चौरस फूट आहे. सीमा सिंग यांनी या कराराद्वारे ९ पार्किंग स्पेसही खरेदी केल्या आहेत. या व्यवहारावर सव्वानऊ कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलंय. याची प्रति चौरस फूट किंमत १ लाख २४ हजार ४४६ रुपये आहे.

'या' कंपनीत हिस्सा

सीमा सिंग या अल्केम लॅबोरेटरीज (Alkem Laboratories) नावाच्या कंपनीच्या प्रवर्तक आहेत. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड असून तिचं मार्केट कॅप ६४,२७८ कोटी रुपये (१२ डिसेंबर २०२४ पर्यंत) आहे. सप्टेंबर २०२४ तिमाहीपर्यंत कंपनीत सीमा सिंग यांचा २.१६ टक्के हिस्सा आहे. 

यापूर्वी जून २०२४ मध्ये सीमा सिंह यांनी अल्केम लॅबोरेटरीजमधील आपला ०.३% हिस्सा विकून १७७ कोटी रुपये उभे केले होते. त्यांनी ३.५८ लाख शेअर्स ४,९५६ रुपये प्रति शेअर दरानं विकले. मार्च २०२४ पर्यंत कंपनीत त्यांचा २.४६ टक्के हिस्सा होता. या ब्लॉक डीलअंतर्गत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडानं १.९२ लाख शेअर्स (०.१५ टक्के) खरेदी केले, तर मॉर्गन स्टॅनली एशिया सिंगापूर पीटीईदेखील त्याचा भाग होता.

लोढा समूहाचा प्रोजेक्ट

सीमा सिंग यांनी विकत घेतलेलं पेंट हाऊस लोढा समूहाच्या प्रकल्पात आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये महागड्या प्रकल्पांसाठी हा समूह ओळखला जातो. कंपनीनं आतापर्यंत १०० दशलक्ष चौरस फुटांहून अधिक रिअल इस्टेटची निर्मिती केली आहे आणि ११० दशलक्ष चौरस फूट नवीन प्रकल्पांवर काम करत आहे.

टॅग्स :व्यवसायमुंबई