Intel CEO Lip Bu Tan Networth: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हात धुवून इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांच्या मागे पडले आहेत. त्यांनी टॅन यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केलीये. ट्रम्प यांनी टॅन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चीनमधील जुन्या व्यावसायिक संबंधांमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आलेय. ट्रम्प म्हणतात की टॅन यांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. रिपब्लिकन सिनेटर टॉम कॉटन यांनीही इंटेलच्या बोर्डाला पत्र लिहून राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
कोण आहे लिप-बू टॅन?
लिप-बू टॅन हे मलेशियात जन्मलेले अमेरिकन टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह, उद्योजक आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांनी इंटेल कॉर्पोरेशनचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. ते वाल्डेन इंटरनॅशनलचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. सेमीकंडक्टर आणि हायटेक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारी ही जागतिक व्हेंचर कॅपिटल फर्म आहे.
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
तान यांचा जन्म १९५९ मध्ये मलेशियातील जोहोर मधील मुआर येथे झाला. त्यांचं संगोपन सिंगापूरमध्ये झालं. सिंगापूरच्या नानयांग विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून न्यूक्लियर इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातून एमबीए केलं.
इंटेलमध्ये सामील होण्यापूर्वी, टॅन यांनी २००९ ते २०२१ दरम्यान कॅडेन्स डिझाइन सिस्टम्सचे सीईओ म्हणून एक दशकाहून अधिक काळ काम पाहिलं. त्यांनी ह्युलेट पॅकार्ड एंटरप्राइज आणि श्नाइडर इलेक्ट्रिकसह अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या संचालक मंडळावरही काम केलंय. सेमीकंडक्टर क्षेत्रातील योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांना सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनकडून रॉबर्ट एन. नॉयस पुरस्कार मिळाला असून फोर्ब्सच्या टॉप ५० व्हेंचर कॅपिटलिस्टच्या यादीत त्यांना स्थान मिळालंय.
नेटवर्थ किती?
२०२५ पर्यंत लिप-बू टॅन यांची अंदाजित नेटवर्थ ५५ कोटी डॉलर ते ७५.९ कोटी डॉलर (४,९०९ कोटी ते ६,६३७ कोटी रुपये) दरम्यान आहे. त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या कॅडेन्स डिझाइन सिस्टीम्समधील सुमारे १.४ मिलियन शेअर्समधून येतो. याची किंमत ४० कोटी ते ५० कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे. वॉल्डन इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्यांची व्हेंचर कॅपिटलच्या गुंतवणुकीचं मूल्य २५ कोटी ते ४०० दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
इंटेलच्या सीईओंवर कोणते आरोप?
सिनेटर कॉटन यांनी इंटेलचे अध्यक्ष फ्रँक येरी यांना लिहिलेल्या पत्रात विचारले की कंपनीच्या बोर्डाला कॅडन्स डिझाइन सिस्टम्सना जारी केलेल्या फेडरल समन्सची माहिती होती का? टॅन तेव्हा सीईओ म्हणून काम करत होते. टॅन यांनी २००८ ते २०२१ पर्यंत कॅडन्सचं नेतृत्व केलं. मे २०२३ पर्यंत कार्यकारी अध्यक्ष राहिले. टॅन यांच्या मागील नेतृत्व आणि गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही संभाव्य सुरक्षा धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी इंटेलने पुरेशी पावलं उचलली आहेत का यावरही सिनेटरनं स्पष्टीकरण मागितलंय.