Join us  

अपडेटेड आयकर रिटर्न कुणाला भरता येईल?, सोप्या शब्दांत जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 6:39 AM

पाहा काय आहे आयकर विभागाची ही तरतूद.

उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंटअर्जुन: कृष्णा, अपडेटेड रिटर्नसाठी आयकर विभागाने काय जाहीर केले आहे? 

कृष्ण: आयकर विभागाने अपडेटेड रिटर्न भरण्याचा फॉर्म आणि पद्धत अधिसूचित केली आहे.

१३९ (८ए) एक नवीन तरतूद करदात्यांना संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांच्या आत  उत्पन्नाचा अपडेटेड परतावा भरण्याचे पर्याय प्रदान करेल. 

१. अपडेटेड रिटर्नची तरतूद आर्थिक वर्ष २०१९-२० पासून लागू होईल. उदा. २०१९-२० साठी अपडेटेड रिटर्न ३१ मार्च, २०२३ पर्यंत भरता येईल. २. अपडेटेड रिटर्न नवीन आयटीआर-यूमध्ये दाखल करता येतील. ३. ऑडिट अंतर्गत समाविष्ट व्यक्तींनी केवळ डिजिटल स्वाक्षरी वापरून रिटर्न सादर करणे आवश्यक आहे. ४.  इतर व्यक्ती डिजिटल स्वाक्षरी किंवा इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड (इव्हिसी) वापरून रिटर्न दाखल करू शकतात.

अर्जुन:  आयटीआर-यू मध्ये कोणते महत्त्वाचे तपशील देणे आवश्यक आहे? 

कृष्ण: १. ज्या मूल्यांकन वर्षासाठी अपडेटेड विवरणपत्र दाखल केले जात आहे. त्या वर्षाच्या रिटर्नचा पोहोच पावती क्रमांक आणि मूळ विवरणपत्र भरण्याची तारीख प्रदान केली पाहिजे.

अर्जुन: कोणत्या अटींनुसार अपडेटेड रिटर्न भरता येईल? 

कृष्ण: १. रिटर्नमध्ये अतिरिक्त उत्पन्न दाखविण्यात येत असेल आणि परिणामी करदात्यासाठी अतिरिक्त कर भरण्यात येत असेल, तरच अपडेटेड रिटर्न दाखल केले जाऊ शकते. २. एका  मूल्यांकन वर्षासाठी फक्त एकच अपडेटेड रिटर्न भरता येईल. ३. मूल्यांकन वर्ष संपल्यापासून १२ महिने आणि २४ महिन्यांच्या आत रिटर्न भरला गेला असेल, तर कराच्या अनुक्रमे २५ टक्के आणि ५० टक्के. अतिरिक्त कर आणि व्याज आकारले जाईल. ४. अपडेटेड रिटर्न फाइल करताना, लागू झालेला कर, व्याज आणि लेट फायलिंग फी भरल्याचा पुरावा ‘अतिरिक्त कर’ म्हणून दाखल करणे आवश्यक आहे. ५. तोट्याचा परतावा असल्यास किंवा कर दायित्व कमी झाल्यास किंवा रिफंड वाढल्यास अपडेटेड रिटर्न दाखल केले जाऊ शकत नाहीत. ६. शोध, जप्तीची प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा पूर्ण झाली आहे, अशा प्रकरणांत किंवा करदात्याविरुद्ध खटल्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकरणांत अपडेटेड विवरणपत्र दाखल केले जाऊ शकत नाही.

टॅग्स :इन्कम टॅक्सभारत