H-1B Visa Fee : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला भीक न घातल्याने ट्रम्प यांनी आता अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर नवीन कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत एच-1बी (H-1B) व्हिसावर १ लाख डॉलर्सच्या (सुमारे ८८ लाख रुपये) भरमसाठ शुल्काची घोषणा झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विशेषतः भारतीय आयटी क्षेत्रात यामुळे धांदल माजली आहे. कारण अमेरिकेतील ७० टक्क्यांहून अधिक एच-1बी व्हिसाधारक हे भारतीय व्यावसायिक आहेत. मात्र, या गोंधळानंतर व्हाईट हाऊसने मोठा खुलासा करत स्पष्ट केले की, हे शुल्क फक्त नवीन अर्जदारांसाठी असून ते एकदाच भरावे लागेल, वार्षिक नाही.
काय आहे नवीन नियम?एच-1बी व्हिसा हा एक नॉन-रेसिडेन्शियल अमेरिकन व्हिसा आहे, जो अमेरिकन कंपन्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि वित्त अशा विशिष्ट क्षेत्रांमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्याची परवानगी देतो. इन्फोसिस, टीसीएस, गुगल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय कर्मचारी या व्हिसावर काम करतात.
नवीन नियमानुसार, प्रत्येक एच-1बी अर्जावर १ लाख डॉलर्स शुल्क लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, हे शुल्क दरवर्षी द्यावे लागेल आणि ते नूतनीकरणासाठीही लागू होईल, असे म्हटले गेले. यामुळे, भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि विमानतळांवर गर्दी झाली.
गोंधळानंतर व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरणया सर्व गोंधळानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले. त्यांनी एच-1बी व्हिसा धोरणासंदर्भातील प्रमुख प्रश्नांची उत्तरे देत परिस्थिती स्पष्ट केली.
प्रश्न: हे शुल्क सर्व अर्जदारांना लागू होईल का?उत्तर: नाही. हे १,००,००० डॉलर शुल्क सध्याच्या व्हिसाधारकांना नाही, तर फक्त नवीन अर्ज करणाऱ्यांवर लावले जाईल. व्हिसाच्या नूतनीकरणासाठी हे शुल्क लागू होणार नाही.प्रश्न: हे शुल्क किती वेळा भरावे लागेल?उत्तर: हे शुल्क वार्षिक नाही, तर नवीन अर्जदारांसाठी एकदाच लागू होईल.
प्रश्न: अमेरिका सोडून पुन्हा प्रवेश करताना अडवले जाईल का?उत्तर: नाही. सध्याच्या एच-1बी व्हिसाधारकांना परदेशातून अमेरिकेत परत येण्यापासून रोखले जाणार नाही. हे व्हिसाधारक सामान्य पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करू शकतात.
वाचा - पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
या घोषणेमुळे भारतात विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला होता. दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या थेट विमानांचे तिकीट दर अवघ्या दोन तासांत ३७,००० रुपयांवरून ७०,००० ते ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, व्हाईट हाऊसच्या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती निवळण्यास मदत झाली आहे. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांकही (+1-202-550-9931) जारी केला आहे.