Join us

कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली? भारताचा पासपोर्ट या नंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 08:09 IST

फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली असल्याचे समोर आले आहे. शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंगमध्ये भारत ८० व्या स्थानी आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मधून ही माहिती समोर आली आहे. पासपोर्ट शक्तिशाली असेल तर त्याच्या आधारे अधिकाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करणे शक्य होत असते. फ्रान्ससोबत जर्मनी, इटली, स्पेन आणि सिंगापूर या देशांनी पहिले स्थान पटकावले आहे. दक्षिण कोरिया, स्वीडन आणि फिनलँड दुसऱ्या स्थानी आहेत. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड हे देश तिसऱ्या स्थानी आहेत.

जाणून घ्या, कोण कितव्या स्थानी?

फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन – १९४

फिनलँड, दक्षिण कोरिया, स्वीडन- १९३

ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड- १९२

बेल्जियम, लक्झेमबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, इंग्लंड- १९१

ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंड- १९०

चेक रिपब्लिक, न्यूझीलंड, पोलंड- १८९

कॅनडा, हंगेरी, अमेरिका- १८८

एस्टोनिया, लिथुआनिया- १८७

लताविया, स्लोवाकिया, स्लोवेनिया- १८६

आईसलँड- १८५

पाकिस्तानी पासपोर्ट कमकुवत

चीनने यंदा दोन पायऱ्या वर चढत ६२ वे स्थान मिळविले आहे. या पासपोर्टच्या आधारे ८२ देशांमध्ये विनाव्हिसा जाता येईल.

भारत यादीत ८० व्या स्थानी असून, भारतीय पासपोर्टवर ७७ देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.

पाकिस्तान यादीत १०१ व्या स्थानी आहे. रँकिंग कमी असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो. या देशाच्या पासपोर्टवर ४७ देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.

युएई मागील वर्षी यादीत १४ व्या स्थानी होता. यंदा या देशाने ११ व्या स्थानी झेप घेतली. या पासपोर्टच्या आधारे १८२ देशांमध्ये विनाव्हिसा जाता येईल.

टॅग्स :पासपोर्ट