Prateek Yadav Net Worth: समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांच्या कौटुंबिक जीवनात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित असा दावा केला आहे की, त्यांची पत्नी अपर्णा यादव यांनी कुटुंब तोडण्याचं काम केलं असून ते आता त्यांना घटस्फोट देणार आहेत. या बातमीनंतर प्रतीक आणि त्यांच्या पत्नी अपर्णा चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, प्रतीक यादव आणि त्यांच्या पत्नीकडे नेमकी किती संपत्ती आहे हे पाहू.
अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आणि मुलायम सिंह यांचे धाकटे सुपुत्र प्रतीक यादव सध्या राजकारणापासून दूर असून स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. प्रतीक अनेक जिमचे मालक आहेत आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांचा मोठा व्यापार आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची नेटवर्थ ६ कोटी ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते असा दावा केला जातो. मात्र, हा अंदाज २०२४ मधील असून सध्या यात वाढ झालेली असू शकते.
५५५% नं वाढला बँकेचा नफा; तरीही शेअर्सची स्थिती वाईट; ९% नं आपटला 'हा' स्टॉक
काय आहे त्यांच्या कमाईचं साधन?
अनेक स्रोतांच्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची नेट वर्थ सुमारे ६ ते ७ कोटींच्या दरम्यान आहे. त्यांच्या कमाईची प्रमुख साधनं जिम व्यवसाय, फिटनेस ट्रेनिंग आणि प्रमोशन्स ही आहेत. याव्यतिरिक्त, रिअल इस्टेट व्यवसायातूनही त्यांना मोठं उत्पन्न मिळतं. प्रतीक दीर्घकाळापासून रिअल इस्टेटमध्ये सक्रिय असून त्यांच्या प्रोफाइलमध्ये प्रॉपर्टी डीलिंग, गुंतवणूक आणि बिल्डिंग्सचा समावेश आहे. फोर्ब्स इंडियानं देखील प्रतीक यांच्या कमाईचा मुख्य स्रोत रिअल इस्टेट असल्याचं सांगितलं आहे.
जिम व्यवसायातून मोठी कमाई
प्रतीक यांनी लखनऊमध्ये 'Iron Core Fit' नावाचा हाय-एंड जिम व्यवसाय सुरू केला आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या जिमच्या आता अनेक शाखा उघडल्या गेल्या आहेत. हे प्रीमियम क्लायंटसाठी असून त्याचं वार्षिक शुल्क सुमारे ३५ हजार रुपये आहे. या जिममध्ये लक्झरी सोयीसुविधा असून सर्व उपकरणे इटालियन आणि अमेरिकन बनावटीची आहेत. फिटनेस ट्रेनिंग आणि विविध ब्रँड्सच्या ब्रँडिंगमधूनही त्यांना उत्पन्न मिळतं.
५ कोटींची लक्झरी कार
प्रतीक यादव यांच्या ताफ्यात महागड्या लक्झरी कार्सचा देखील समावेश आहे. यात सर्वात महागडी ५ कोटी रुपयांची 'लॅम्बोर्गिनी' कार आहे. प्रतीक यांची वार्षिक कमाई सुमारे १.५ कोटी रुपये सांगितली जाते, जी त्यांचे भाऊ अखिलेश यादव यांच्यापेक्षाही जास्त आहे. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ते राजकारणात नसल्यामुळे त्यांना प्रतिज्ञापत्रात या संपत्तीचा खुलासा करावा लागत नाही.
अपर्णा यादव यांच्याकडे किती संपत्ती आहे?
अपर्णा यादव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि अपर्णा यांची मिळून जंगम आणि स्थावर संपत्ती सुमारे २३ कोटी रुपये आहे. रोख रक्कम, दागिने आणि एफडीमध्ये त्यांची सुमारे ३.२० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसंच १२ लाख रुपयांची शेतजमीनही त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे एकट्या अपर्णा यांच्याकडे सुमारे १५ कोटींची संपत्ती आहे, जी प्रतीक यांच्या संपत्तीच्या दुप्पट आहे. अपर्णा सध्या भाजपशी संबंधित असून त्या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत.