Join us  

संवत २०७७च्या पोटात दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 5:46 AM

 देशात मार्च २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे अर्थ, उद्योगाचे पार कंबरडे मोडून पडले. परंतु त्याच वेळेस  भारतीय शेअर बाजाराची वाटचाल मात्र  गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडणारी ठरत आहे. 

- प्रा. नंदकुमार काकिर्डे, शेअर बाजाराचे तज्ज्ञ व काॅसमाॅस बँकेचे संचालकदीपावलीच्या उत्सवामध्ये शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी विक्रम संवत वर्ष २०७६ची अखेर व नव्या संवत २०७७चा प्रारंभ झाला. एका बाजूला कोरोना महामारीने भारतासह संपूर्ण जगामध्ये तांडव निर्माण केलेले असताना सर्व जगाची आर्थिक परिस्थिती पूर्णत: कोलमडून पडली. भारत याला अपवाद नाही.

 देशात मार्च २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे अर्थ, उद्योगाचे पार कंबरडे मोडून पडले. परंतु त्याच वेळेस  भारतीय शेअर बाजाराची वाटचाल मात्र  गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडणारी ठरत आहे. दीपावली उत्सवामध्ये संवत २०७७चा अगदी उत्साहामध्ये, तेजीमय वातावरणात प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, व्यवसाय, उद्योग व्यापाराची वाताहात, अर्थव्यवस्थेतील घसरगुंडी या पार्श्वभूमीवर संवत २०७७ हे वर्ष भारतीय शेअर बाजाराला खूपच सकारात्मक किंवा तेजीमय जाईल, असे म्हणावयास हरकत नाही. हे वर्ष सुरू झाल्यापासूनच्या मुहूर्त व्यवहारांपासूनच मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही बाजारांवर तेजीचाच प्रभाव वाढताना दिसत आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर निर्देशांकातील प्रमुख ३० कंपन्या व निफ्टीच्या ५० कंपन्या यांच्यावर गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्ण लक्ष ठेवले तर पुढील वर्षात त्यांना निश्चित चांगला परतावा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सध्याचे चित्र दिसते. रिझर्व्ह बँकेने नुकतेच त्यांचे वित्तीय धोरण जाहीर केले. त्यांनी रेपो किंवा रिव्हर्स रेपो दरात म्हणजे त्यांच्या व्याजदरात काहीही बदल केले नाहीत. मात्र आगामी चार पाच महिन्यामध्ये म्हणजे मार्च २०२१ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत अनुकूल बदल होऊन रिझर्व्ह बँकेच्या धोरणात त्यानुसार वाजवी बदल करण्यात येतील, असे सूतोवाच करण्यात आले आहे. २०२१-२२ या वर्षामध्ये प्रकर्षाने वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(उत्तरार्ध उद्याचा अंकात)

भारतीय अर्थव्यवस्थेचा आजवरचा इतिहास पहाता ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था संकटात किंवा अडचणीत येते तेव्हा तिने पुन्हा सकारात्मक उसळी घेतल्याची अनेक उदाहरणो आहेत. अगदी त्याची ठळक उदाहरणे द्यायची असली तर १९९० मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा केलेला स्वीकार, इ.स. २००० मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांना लाभलेली गती, खासगीकरण, पायाभूत सुविधांमध्ये चांगली वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्राबल्य वाढले. यामुळेच गेल्या नऊ महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा चांगली उसळी घेईल, असे आजवरच्या इतिहासावरून नक्की अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. 

गुंतवणूकदारांना चांगला परतावासंवत २०७६चा आढावा घ्यायचा झाला तर या वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४ हजार ३८५ अंशांनी वर जाऊन ३९,०५८.०६ अंश पातळीवरून ११.२३ टक्के वर जाऊन ४३,४४३ अंश पातळीवर बंद झाला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा याच काळात ११३६.०४ अंश वर गेला त्यामध्येही ८.८१ टक्के वाढ या वर्षात झाली. म्हणजे अन्य कोणत्याही गुंतवणुकीच्या तुलनेत या वर्षात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. 

टॅग्स :शेअर बाजार