चंद्रकांत दडस, उपसंपादक
आजकाल अनेक श्रीमंत उद्योगपतींची मुले त्यांच्या आई-वडिलांचा पारंपरिक व्यवसाय चालवण्याऐवजी स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करत आहेत. ही मुले पारंपरिक व्यवसायाच्या चौकटीबाहेर जाऊन विविध क्षेत्रांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. त्यांना केवळ आर्थिक यश नव्हे, तर सामाजिक प्रभाव, नावीन्य आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे. त्यांचं शिक्षण, विचार आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे ते नव्या संधी शोधत असल्याचे समोर आले आहे. श्रीमंतांच्या मुलांना नेमका कोणता व्यवसाय करायचा आहे हे जाणून घेऊ...
टेक्नॉलॉजी आणि नावीन्य यात रस
श्रीमंतांच्या मुलांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सध्या बदलत आहे. त्यांनी पैसा पाहिलेला असतो, त्यामुळे त्यांना फक्त पैसा नको असतो तर त्यासोबतच एक स्वतंत्र ओळख, नावीन्यपूर्ण व्यवसाय आणि समाजासाठी काही चांगले करायचे असते. टेक्नॉलॉजी आणि नावीन्य यात बिझनेस फॅमिलीतील मुले रस दाखवताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक, नैतिक आणि दीर्घकालीन परिणाम देणारे व्यवसाय प्राधान्याने ते निवडत आहेत.
स्टार्टअपसह हे उद्योग...
बिझनेस फॅमिलीतील मुले स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न करत असून, यातही ते पर्यावरणपूरक व्यवसायात रस घेत आहेत. ते एआय, फिनटेक, हेल्थटेक, एज्युकेशन टेक, मोबाइल ॲप्स, ग्रीन एनर्जी, हेल्थटेक, एज्यु टेक, गेमिंग आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांमध्येही जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही तरुण सोशल मीडियावर स्वतःचे ब्रँड तयार करत आहेत तर काहीजण ऑनलाइन शिक्षण किंवा ई-कॉमर्समध्ये नवे मार्ग शोधत आहेत.
तयार करतात स्वतःचा ब्रँड
काही तरुण स्वतःचा ब्रँड तयार करत आहेत. कपडे, सौंदर्यप्रसाधने, हेल्थ प्रॉडक्ट्स, रिन्युएबल एनर्जी यात नवीन काही करता येईल का यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. काही तरुण स्वतः व्यवसाय न करता इतर स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत आहेत.