Join us

ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:50 IST

China on US Tariffs: बुधवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ८४ टक्क्यांपर्यंत वाढवून बीजिंगनेही परस्पर शुल्काला प्रत्युत्तर दिले.

China on US Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टॅरिफला ३ महिन्यांची स्थगिती देत जगभरातील अनेक देशांना दिलासा दिला. मात्र, यात चीनवर आपला राग कायम ठेवला आहे. ट्रम्प यांनी आधी लादलेल्या टॅरिफला चीनने जशास तसे दिलेले उत्तर अमेरिकेच्या जिव्हारी लागले. त्यानंतर अमेरिकेने बीजिंगमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क १०४ टक्क्यांवरून १२५ टक्के करत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अनेक व्यापारी भागीदार देशांनी प्रत्युत्तराऐवजी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतल्याने टॅरिफला ब्रेक लावणार आहेत. पण, चीनने याचा आदर केला नसल्याचे सांगत गंभीर आरोप केले.

अमेरिका-चीनमध्ये टॅरिफ वॉरसर्वात आधी अमेरिकेने चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लागू केले होते. याला प्रत्त्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकी मालावर तेवढेच शुल्क लादले. संपूर्ण जग वाटाघाटी करण्यास तयार असताना चीनची ही कृती ट्रम्प यांच्या जिव्हारी लागली. यावर अमेरिकेने चिनी वस्तूंवर १०४ टक्के लादले. त्यावर बुधवारी बीजिंगने अमेरिकेच्या आयात वस्तूंवरील शुल्क ८४% पर्यंत वाढवून या शुल्कांना प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांना एक कडक संदेश देण्याचा हा शी जिनपिंग यांचा हा प्रयत्न होता. पण, ट्रम्प यांनीही हे शुल्क वाढवून १२५ टक्क्यांवर नेलं आहे.

चीनकडे काय पर्यायअमेरिकेसमोर झुकणार नाही, अशीच भूमिका सध्यातरी चीनची आहे. सध्या जगातील २ महासत्ता देशांमधील व्यापारी तणाव वाढत आहे. याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवरही होत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) आपला निषेध नोंदवल्याचे चीनने म्हटले आहे. पिनपॉइंट अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ झिवेई झांग यांनी एएफपीला सांगितले की, चीनने स्पष्ट संकेत दिला आहे की तो मागे हटणार नाही. ते पुढे म्हणाले की, हा तणाव लगेच निवळेल अशी चिन्हे नाहीत.

अमेरिकेला या वस्तूंची निर्यात रोखणार?स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, चीन दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवू शकतो. या खनिजांचा वापर संगणक चिप्स आणि इलेक्ट्रिक बॅटरीसारख्या उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांसाठी केला जातो. याने अमेरिकेला नक्कीच तोटा होईल. कारण, इलेक्ट्रिक उत्पादन करणाऱ्या टेस्ला सारख्या अनेक कंपन्या या देशात आहेत. अहवालानुसार, चीनकडून अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

वाचा - स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी

भारतासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्नगेल्या दशकापासून भारताचा चीनसोबत सीमावाद सुरू आहे. चीन कायमच देशाविरोधात कुगघोड्या करत आला आहे. पण, ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे चीन आता गुडघ्यावर आला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठ आता चीनला जवळची वाटू लागली आहे.  यात भारत संधी साधून अनेक प्रश्न मार्गी लावू शकतो.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पचीनअमेरिकाटॅरिफ युद्ध