Join us  

बीएस-६, हायब्रीड वाहन करात सवलतीसाठी आपण प्रयत्न करू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 3:57 AM

नितीन गडकरी; केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

नवी दिल्ली : हायब्रीड कार आणि बीएस-६ इंजिन असलेल्या वाहनांना वस्तू व सेवा करात सवलत देण्याच्या वाहन उद्योगाच्या मागणीला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी समर्थन दिले आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आपण हा मुद्दा उपस्थित करू, असे त्यांनी म्हटले आहे. वाहन उत्पादक उद्योगाची संघटना ‘सियाम’च्या वार्षिक परिषदेत गडकरी यांनी म्हटले की, पेट्रोल व डिझेलच्या वाहनांना कर सवलत मिळायला हवी, अशी मागणी वाहन उद्योगाने केली आहे. तुमची मागणी चांगली आहे. मी तुमचा संदेश वित्तमंत्र्यांकडे घेऊन जाईन. करात तात्पुरती कपातही फायदेशीर ठरू शकते. याचा मी वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन. वाहन विक्री वाढण्यासाठी या क्षेत्राला याक्षणी मदतीची गरज आहे.

वाहनांची विक्री सध्या विक्रमी पातळीवर घसरली आहे. त्यामुळे वाहन उद्योगाकडून कर सवलतीची मागणी केली जात आहे. सध्या कारवर २८ टक्के जीएसटी आहे. छोट्या कारवर १ टक्का कमी जीएसटी लागतो. एसयूएव्हींवर १५ टक्के अतिरिक्त उपकरासह एकूण ४३ टक्के कर लागतो. गडकरी यांनी सांगितले की, वाहन उद्योगाने अंतर्गत वित्त शाखा सुरू कराव्यात. त्यातून विक्री वाढण्यास मदत होईल.ग्राहकांना लाभ मिळायला हवासूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत सरकारने कर सवलत देण्याचे टाळले आहे. त्याऐवजी प्रोत्साहन लाभ देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. ग्राहकांना देय असलेले लाभ वाहन उद्योग नेहमीच स्वत:च्या खिशात घालत आला असल्याचे सरकारचे मत आहे. जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर कमी झालेली करांची देयता ग्राहकांपर्यंत पोहोचविली जात नसेल, तर नफाविरोधी तरतुदीद्वारे दंड ठोठावता येऊ शकतो. जीएसटीत कपात करण्याचा निर्णय एकटे केंद्र सरकार घेऊ शकत नाही. जीएसटी परिषदेची मान्यता त्याला लागते.

टॅग्स :नितीन गडकरीकारवाहन