Join us  

अद्याप विकासाचा मोठा टप्पा पार करायचा आहे : रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 6:03 AM

जगावरील कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही आता ओमायक्रॉनची भीती जगाला भेडसावत आहे. त्यावर आपण औषधे शोधू पण निसर्ग आपल्याला त्याच्यापुढे जाऊ देत नाही, हे सत्य पुन्हा एकदा समोर येत असल्याचे राजन यांनी सांगितले.

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था व्ही आकाराने वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही आपल्याला विकासाचा मोठा टप्पा पार करावयाचा असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. कोविडपूर्वकाळातील स्थितीला पोहोचण्यासाठी आपल्याला दोन वर्षांचा कालावधी लागला ते केवळ आपल्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळेच असे राजन यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजन यांनी देशाच्या आर्थिक वाढीबद्दलचे मत व्यक्त केले. मोठ्या प्रमाणातील घसरणीनंतर वाढ ही कायमच व्ही आकारात होत असल्याचे स्पष्ट करून राजन म्हणाले की, त्यामुळेच आताच्या व्ही आकारातील वाढीला फारसा अर्थ नाही. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग मोठा आहे. त्यामुळे आपण दोन वर्षांच्या काळामध्ये झालेली घट भरून काढू शकलो आहे. मात्र जगातील अनेक देश अद्यापही कोविडपूर्वपातळीवर आलेले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जगावरील कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही आता ओमायक्रॉनची भीती जगाला भेडसावत आहे. त्यावर आपण औषधे शोधू पण निसर्ग आपल्याला त्याच्यापुढे जाऊ देत नाही, हे सत्य पुन्हा एकदा समोर येत असल्याचे राजन यांनी सांगितले.

चलनवाढीच्या मुद्द्यावर मत देताना राजन म्हणाले की देशातील पुरवठा साखळी जर सुरळीत असेल तर महागाईला आळा घालणे काही कठीण जात नाही. कोविडच्या काळामध्ये ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ती आता बरीचशी सुरळीत झाली आहे. त्यामुळे आता महागाईकमी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे केले जात असलेले उपाय हे योग्य मार्गावर असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

टॅग्स :रघुराम राजन