नवी दिल्ली : जगभरात गेल्या दाेन दशकांपासून अनेक देशांमध्ये युद्ध आणि संघर्ष वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर माेठा परिणाम झाला आहे. त्यापासून भारतदेखील सुटलेला नाही. देशातील इलेक्ट्राॅनिक कंपाेनेंट, पेट्राेलियम, परिवहन, पर्यटन आणि आदरातिथ्य, खानपान यासारख्या १५ क्षेत्रांचा विकास प्रभावित झाला असून देशाच्या आर्थिक विकासदरावरही त्याचा परिणाम झालेला आहे.
राष्ट्रीय लाेक वित्त संस्थेने केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशाेधन करण्यात आले आहे.
काेणत्या क्षेत्रांना बसला फटका?
कृषी, इलेक्ट्राॅनिक कंपाेनेंट, वित्त, खानपान, माहिती तंत्रज्ञान, पेट्राेलियम, पेट्राेलियम उत्पादने, एलएनजी टॅंकर, सागरी व तटीय मालवाहतूक, शिपिंग, दूरसंचार, तंबाखू उत्पादने, परिवहन, पर्यटन व आदरातिथ्य.
तेल कंपन्यांचे आर्थिक मोठे नुकसान
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि युराेपियमन महासंघाने बरेच निर्बंध लावले आहेत. भारताने रशियाकडून स्वस्त कच्चे तेल माेठ्या प्रमाणात खरेदी केले.
त्यावर प्रक्रिया करून युराेप व इतर देशांना पेट्राेलियम उत्पादनांचा पुरवठा केला. मात्र, निर्बंधांमुळे सरकारी तेल कंपन्यांचे ९० काेटी डाॅलर रुपयांचे पेमेंट अडकले आहे. भारताला इतर देशांसाेबत व्यापारी संबंधांचे लक्ष्य गाठण्यासही विलंब हाेत आहे.
आरबीआयची महत्त्वाची भूमिका
ससध्याच्या जागतिक व देशांतर्गत आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या आरबीआयची पतधाेरण समितीची बैठक सुरू आहे. त्यात विविध विषयांवर चर्चा हाेणार आहे.
आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यात येईल. जागतिक परिस्थिती विचारात घेऊन देशाच्या आर्थिक विकासासाठी आरबीआयची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
सेमी कंडक्टर क्षेत्रात पीछेहाट
अनेक देशांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांना भारतात सेमी कंडक्टर चिप निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात अडचणी आल्या. जगभरात सेमी कंडक्टर चिपचा माेठा तुटवडा हाेता. भारतातील सेमी कंडक्टर क्षेत्रावर याचा व्यापक परिणाम झाला. अजूनही भारत या क्षेत्रात उद्दिष्टांच्या बराच मागे आहे.