Join us

पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:32 IST

Vodafone Idea Recharge : जुलैमध्ये सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ केली होती. आता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Vodafone Idea Recharge : जुलैमध्ये सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ केली होती. तेव्हापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान, टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाच्या (Vi) एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं मोठं विधान समोर आलं आहे. त्यांनी अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांकडून अधिक शुल्क आकारण्याविषयी वक्तव्य केलं.

"जे युझर अधिक इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारल्यानं मोबाइल सेवा उद्योगाला योग्य रिटर्न मिळेल. तसंच समाजातील सर्वच लोकांना कनेक्टिव्हिटीही मिळेल," असं व्होडाफोन आयडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. यापूर्वीही व्होडाफोन आयडियानं आपल्या कंपनीचा तोटा कमी करण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

क्षेत्र महत्त्वाच्या वळणावर

व्होडाफोन आयडियानं (व्हीआयएल) ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बुधवारी जाहीर केले. "नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे बीएसएनएलला होणारं ग्राहकांचं नुकसान आता सरकारी टेलिकॉम कंपनीच्या 'नेटवर्क अनुभवा'मुळे भरून निघत आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्र एका महत्त्वाच्या वळणावर आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मुंदडा म्हणाले, 

मोठ्या गुंतवणुकीची गरज

एकीकडे नवीन तंत्रज्ञानाला आणि डेटा डेव्हलपमेंटला समर्थन देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे समाजातील सर्व घटकांना कनेक्टिव्हिटी देण्यासाठी करण्यासाठी परवडणारं टॅरिफ ठेवण्याची आवश्यकता आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सेवांचा अधिक वापर करणारे ग्राहक असतील, जेणेकरून उद्योगाला केलेल्या मोठ्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळू शकेल. त्यामुळे भांडवलाचा खर्च वसूल करण्यासाठी उद्योगानं दर अधिक तर्कसंगत करण्याची गरज आहे," असंही मुंदडा म्हणाले.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)व्यवसाय