Join us  

एअरटेलपाठोपाठ व्होडाफोन आयडियाची दरवाढ; २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:45 PM

व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महागणार; एअरटेलच्या पावलावर पाऊल टाकत दरवाढ

मुंबई: आर्थिक संकटात सापडलेली व्होडाफोनआयडिया लिमिटेड लवकरच दरवाढ करणार आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून व्होडाफोनआयडियाचे प्रीपेड प्लान्स महाग होतील. व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर २५ टक्क्यांनी वाढवणार आहे. त्याआधी एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता व्होडाफोन आयडियानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे.

प्रती ग्राहक महसूल (एआरपीयू) वाढवण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कंपनीनं २५ नोव्हेंबरपासून प्रीपेड प्लानचे दर २५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे ११ मोबाईल फोन प्लान्स आणि चार डेटा पॅकेजेसचा दर जवळपास २० टक्क्यांनी वाढणार आहे. व्होडाफोन आयडियाची स्पर्धक कंपनी असलेल्या एअरटेलनं कालच २० ते २५ टक्क्यांची दरवाढ जाहीर केली. एअरटेलचे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील.

नव्या प्लान्समुळे एआरपीयू वाढेल आणि आर्थिक भार कमी होईल, अशी आशा व्होडाफोन आयडियानं व्यक्त केली. नव्या दरवाढीमुळे कंपनीला नेटवर्कची क्षमता वाढवता येईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडियाला एआरपीयू वाढवण्याची नितांत गरज आहे. सध्या कंपनीला मिळणारा एआरपीयू १०९ रुपये आहे. कंपनीला ४जी नेटवर्कचा विस्तार करायचा असल्यास आणि रिलायन्स जिओ, एअरटेलला टक्कर द्यायची असल्यास महसूल वाढ गरजेची आहे.व्होडाफोन आयडियाच्या स्पर्धक कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ, एअरटेल नफ्यात आहेत. तर व्होडाफोन आयडिया तोट्यात आहे. खर्च वाढत असताना दुसऱ्या बाजूला ग्राहक संख्या कमी झाल्यानं कंपनीचा महसूल घटला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचे २४ लाख ग्राहक कमी झाले. व्होडाफोन आयडिया आणि प्रतिस्पर्ध्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये शेवटची दरवाढ केली होती त्यानंतर दूरसंचार क्षेत्राचा एआरपीयू जवळपास १५ टक्क्यांनी वाढला होता.

टॅग्स :व्होडाफोनआयडियाएअरटेलरिलायन्स जिओ