Join us
Daily Top 2Weekly Top 5

विशाल सिक्कांचा राजीनामा आणि अवघ्या काही तासात 30 हजार कोटी रूपये गेले पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 19:15 IST

'इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली.

ठळक मुद्दे'इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली.त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आलं आणि इन्फोसिसचे शेअर अक्षरशः गडगडले.

मुंबई, दि. 18 -'इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली. कंपनीच्या महसुलात झालेली घट आणि संस्थापकांशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आलं आणि इन्फोसिसचे शेअर अक्षरशः गडगडले. याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशकांवरही झाला. 2014 मध्ये विशाल सिक्का यांनी कार्यभार सांभाळेपर्यंत इन्फोसिसच्या शेअर्सचं बाजार मुल्य (मार्केट कॅपिटलायजेशन) जवळपास 1.80 लाख कोटी रूपये होतं आणि गुरूवारपर्यंत मार्केट कॅपिटलायजेशन 2.34 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढलं होतं. पण शुक्रवारी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 13 टक्क्यांनी घट झाली. इन्फोसिसच्या शेअरचं बाजारमूल्य 30 हजार कोटी रुपयांनी घसरून 2.04 लाख कोटी रुपयांवर स्थिरावलं. 

विशेष म्हणजे इन्फोसिसचे सहसंथापक असलेल्या नारायण मूर्ती व त्यांच्या कुटुंबियांकडे इन्फोसिसचे 3.44 टक्के शेअर आहेत. त्यांचे बाजारमूल्य आज सकाळी 8068 कोटी रुपये होते ते घसरून 7040 कोटी रुपये झाले आहे. इन्फोसिसच्या शेअरचा भाव 13 टक्क्यांनी घसरून एका वर्षाच्या नीचांकावर म्हणजे 844 रुपयांवर स्थिरावला आहे.प्रविण राव यांची नियुक्ती -  विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर प्रविण राव यांची तात्पुरती सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 18 ऑगस्टला झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. इन्फोसिसकडून पत्राव्दारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली. सिक्का यांची इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती.  कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती. काय म्हणाले विशाल सिक्का-बरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले आहे. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर  अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला आहे. 

टॅग्स :निर्देशांक