Join us  

पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 4:03 PM

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती.

Go Digit General Insurance IPO: सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या (Go Digit General Insurance) आयपीओला मान्यता दिली आहे. आयपीओद्वारे नवीन शेअर्स जारी करून १२५० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. दरम्यान, कंपनीनं आयपीओसाठी अर्ज करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, बाजार नियामकानं फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीच्या आयपीओचा अर्ज नाकारला होता. कॅनेडियन अब्जाधीश प्रेम वत्स यांचा फेअरफॅक्स ग्रुप आणि टीव्हीएस कॅपिटल फंड यांची कंपनीत गुंतवणूक आहे. 

गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीनं ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आयपीओमधून १२५० कोटी रुपये उभारणार आहे. याशिवाय १०.९४ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. यामध्ये प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदार हिस्सा विकतील. भारतीय दिग्गज क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही गो डिजिट कंपनीत गुंतवणूक केली आहे. कंपनीनं यापूर्वी २०२१ मध्ये ३.५ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला होता. 

यापूर्वीही केलेला अर्ज 

गो डिजिट इन्शुरन्स मोटर, हेल्थ, ट्रॅव्हल, प्रॉपर्टी, मरीन आणि लायबलिटी इन्शुरन्स यासारखी उत्पादनं ऑफर करते. कंपनीनं ऑगस्ट २०२२ मध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता. मात्र, कंपनीच्या ईएसओपीएसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सेबीनं तो स्थगित केला होता. सेबीच्या आक्षेपानंतर कंपनीला ३५०० कोटी रुपयांचा आयपीओ पुन्हा दाखल करावा लागला. कंपनीनं कर्मचाऱ्यांचा स्टॉक ॲप्रिसिएशन प्लॅन लिंक्ड बोनस कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीशी जोडला होता, ज्याला परवानगी नाही.   

कंपनीची स्थिती काय? 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा १०७ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत तो १० कोटी रुपये होता. जानेवारी २०२४ मध्ये कंपनीचं एकूण देशांतर्गत प्रीमियम उत्पन्न ६६४५ कोटी रुपये होतं. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्क्यांनी अधिक आहे.  

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासेबीइनिशिअल पब्लिक ऑफरिंग