Join us

विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:58 IST

बॅग, सूटकेस, ट्रॉली बॅग, ब्रीफकेस आदी बनवणारी ही महाकाय कंपनी आता ५४ वर्षांनंतर विकली जाणार आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि काय आहे कारण?

बॅग, सूटकेस, ट्रॉली बॅग, ब्रीफकेस आदी बनवणारी व्हीआयपी इंडस्ट्रीज (VIP Industries) ही महाकाय कंपनी आता ५४ वर्षांनंतर विकली जाणार आहे. कंपनीचे प्रवर्तक दिलीप पिरामल आणि त्यांचे कुटुंबीय आपला ३२ टक्के हिस्सा पर्यायी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी मल्टिपल्सला विकणार आहेत. मल्टिपल कन्सोर्टियमनं हा करार पूर्ण केल्यास सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) टेकओव्हर नॉर्म्सनुसार खुल्या बाजारातून आणखी २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

दिलीप पिरामल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मल्टिपल्स कन्सोर्टियमसोबत कंपनीतील ३२ टक्के हिस्सा विकण्यासाठी निश्चित करार केला आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कंपनीचं नियंत्रण मल्टिपल्स प्रायव्हेट इक्विटीकडे हस्तांतरित केलं जाईल, तर दिलीप पिरामल आणि त्यांचे कुटुंबीय कंपनीचे भागधारक राहतील. करारातील अटींनुसार पिरामल व्हीआयपी इंडस्ट्रीजचे मानद अध्यक्ष म्हणून कायम राहतील.

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

खुल्या बाजारातही ऑफर

व्हीआयपी इंडस्ट्रीजनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, कंपनीच्या सार्वजनिक भागधारकांकडून ३.७० कोटी शेअर्स खरेदी करण्यासाठी मल्टीपल्स कन्सोर्टियमनं दिलेल्या ओपन ऑफरबद्दल देखील माहिती दिली. कंपनीनं म्हटलंय की, ओपन ऑफर ३८८ रुपये प्रति शेअर या किमतीत आणली जाईल, जी सेबी नियमनाच्या नियमांतर्गत निश्चित करण्यात आली आहे. यावर, व्हीआयपीचे अध्यक्ष दिलीप पिरामल यांनी प्रतिक्रिया देत कंपनीचा भागीदार म्हणून आम्ही मल्टीपल्स कन्सोर्टियमचे स्वागत करत असल्याचं म्हटलं. 

१९७१ पासून व्यवसाय

व्हीआयपी कंपनीची स्थापना १९७१ मध्ये झाली. व्हीआयपी इंडस्ट्रीज ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लगेज उत्पादक कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ४५ देशांमध्ये कार्यरत आहे, जिथे तिची १०,००० हून अधिक विक्री केंद्रं आहेत.

कंपनीकडे किती ब्रँड

व्हीआयपी इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६,४८१.७८ कोटी रुपये आहे. या क्षेत्रात कंपनीला सॅमसोनाईट आणि सफारी इंडस्ट्रीजशी कडक स्पर्धा आहे. कंपनीकडे अ‍ॅरिस्टोक्रॅट, व्हीआयपी, कार्लटन, स्कायबॅग्ज आणि कॅप्रिससारखे ब्रँड आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 'ब्रँडेड लगेज' मार्केटमध्ये तिचा ५० टक्क्यांहून अधिक वाटा होता. तथापि, आता कंपनीला प्रतिस्पर्ध्यांकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे आणि तिचा बाजारातील वाटा हळूहळू कमी होत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये व्हीआयपी इंडस्ट्रीजचं उत्पन्न २,१६९.६६ कोटी रुपये होतं.

टॅग्स :व्यवसाय