Artificial Intelligence : एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या खाणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सिलिकॉन व्हॅलीतील प्रसिद्ध भांडवलदार आणि अब्जाधीश विनोद खोसला यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकांची झोप उडेल. त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात माणसांच्या ८० टक्के नोकऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता घेणार आहेत. अशा स्थितीत तरुणांनी काय करावं? याचाही सल्ला त्यांनी दिला आहे.
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या WTF पॉडकास्टवर बोलताना खोसला म्हणाले की, "हे मानवतेने पाहिलेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक असेल." त्यांच्या मते, येत्या ५ वर्षांत एआय जवळजवळ प्रत्येक उद्योगात, म्हणजेच कायदा, अर्थकारण, वैद्यकशास्त्र आणि ग्राहक सेवा अशा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करेल.
तज्ज्ञ नाही तर 'सामान्य' व्हाखोसला यांनी तरुण व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. ज्या जगात मशीन्स माणसांपेक्षा जास्त चांगले आणि विशेष काम करू शकतात, तिथे 'अनुकूल' (adaptable) असणे महत्त्वाचे आहे. यापुढे तज्ज्ञांपेक्षा सामान्य राहणे अधिक सोयीचं राहणार आहे. कारण, एआय तुमच्यापेक्षा जास्त चांगला तज्ज्ञ म्हणून काम करेल. भविष्यात टिकून राहण्यासाठी सर्जनशीलता, विचार करण्याची क्षमता आणि विविध गोष्टींना जोडण्याची क्षमता आवश्यक असेल, असेही खोसला म्हणाले.
शिक्षण आणि आरोग्यसेवा मोफतनोकरीच्या बाजारात मोठं आव्हान उभं राहत असताना, खोसला एआयच्या सकारात्मक बाजूबद्दलही आशावादी आहेत. ते म्हणतात की, येत्या २५ वर्षांत वैद्यकीय सल्ला आणि जागतिक दर्जाचे शिक्षण हे प्रभावीपणे मोफत होईल.अशा जगाची कल्पना करा जिथे तुम्हाला सर्वोत्तम डॉक्टरांसारखा चांगला वैद्यकीय सल्ला आणि सर्वोत्तम शिक्षकांसारखं मोफत शिक्षण मिळेल,एआयमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा वैयक्तिक शिक्षक मिळेल, ज्यामुळे महागड्या विद्यापीठांची आणि शिकवण्यांची गरज राहणार नाही.
मोठ्या शहरांची मक्तेदारी संपणार?एआयमुळे संधी फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहणार नाही. खोसला यांच्या मते, एआय आर्थिक संधींचे विकेंद्रीकरण करेल. त्यामुळे न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहरांसोबत आता लहान शहरे आणि गावेही स्पर्धा करू शकतील. जगभरात मोठ्या कंपन्या नोकरकपात करत असताना, खोसला यांचे हे बोलणे स्पष्ट आहे. एआय तुमच्या नोकरीसाठी येत नाही, ते आधीच आले आहे. पण त्यांनी लोकांना घाबरण्याऐवजी, कुतूहल आणि स्वतःला सतत नवीन शिकण्याच्या प्रक्रियेत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
वाचा - ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
एआय म्हणजे काय?कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान माणसांप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते आणि समस्या सोडवू शकते. एआयचा वापर अनेक क्षेत्रांत होतो, जसे की स्मार्टफोनमधील व्हर्च्युअल असिस्टंट, ऑनलाइन शॉपिंगमधील शिफारसी आणि सेल्फ-ड्रायव्हिंग कार. हे एक साधन असून, त्याचा वापर आपण कसा करतो, यावरच त्याचे भविष्य अवलंबून आहे.