Join us  

विजय शेखर शर्मांचा निर्धार, म्हणाले- Paytm ला आशियातील सर्वात मोठी कंपनी बनवणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 7:13 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm Payments Bank वर कारवाई केल्यानंतर कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली.

Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) Paytm Payments Bank वर बंदी घातल्यानंतर आता कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. शर्मांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला असेल, पण आता त्यांनी Paytm ला आशियातील सर्वात मोठी कंपनी बनवण्याचा निर्धार केला आहे. जपनाच्या टोकिओमध्ये आजोजित एका फिनटेक इव्हेंटमध्ये ते बोलत होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घातली होती. नंतर आरबीआयने कंपनीला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे विजय शेखर शर्मा यांना कंपनीचे प्रमुखपद सोडावे लागले. आता शर्मा पहिल्यांदाच याबाबत बोलले. शर्मा म्हणाले की, आयुष्यातील हा काळ लवकरच संपेल आणि पेटीएम आशियातील सर्वात मोठी कंपनी बनेल.

रिपोर्टनुसार, 31 जानेवारी रोजी आरबीआयच्या कारवाईनंतर शर्मा पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर आले. यावेळी शर्मा म्हणतात की, पेटीएम या वर्षात सर्व अडचणीतून बाहेर येईल आणि पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन करेल. या संपूर्ण घटनेत मी एक धडा शिकला. कधीकधी तुमचे सहकारी आणि सल्लागार काही गोष्टी नीट समजत नाहीत, पण तुमच्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात, असंही ते यावेळी म्हणाले. 

पेटीएमने सल्लागार समिती स्थापन केली आरबीआयच्या कारवाईनंतर 9 फेब्रुवारी रोजी पेटीएमने सांगितले होते की, बाजार नियामक सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या नेतृत्वाखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती त्याचे पालन आणि नियमन याबाबत सल्ला देईल. 3 सदस्यांच्या या समितीमध्ये ICAI चे माजी अध्यक्ष एमएम चितळे आणि आंध्र बँकेचे माजी CMD आर रामचंद्रन यांचा समावेश आहे.

टॅग्स :पे-टीएमव्यवसायगुंतवणूकसेबीभारतीय रिझर्व्ह बँक