मनोज गडनीसविशेष प्रतिनिधी
सन १९९० ते २००० च्या दरम्यान दोन गोष्टी व्हायच्या. व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) आला की एकीकडे तरुणाईची लगबग असायची ती ग्रीटिंग कार्डांच्या दुकानांत आणि फुल विक्रेत्यांकडे. फुलांची खरेदी म्हणजे प्रामुख्याने गुलाबांची आणि दुसरी गोष्ट व्हायची ती कॉलेजमध्ये मुले जरा जपूनच जायची. कारण त्या काळात काही राजकीय पक्ष ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करायचे आणि सरळ कॉलेजमध्ये घुसून तरुणांना हाणायचे. कालौघात एकीकडे राजकीय पक्षांचा विरोध कमी झाला आणि दुसरीकडे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर विकसित होत गेले. ग्रीटिंग कार्ड हद्दपार झाले. त्यांची जागा प्रेमाचे संदेश वाहणाऱ्या एसएमएस मग व्हॉट्सॲप आणि आता इन्स्टा रिल्सने घेतली. पण या नव्या डिजिटल माध्यमांच्या कोलाहलात फुलांची जागा मात्र अबाधितच नव्हे तर शाश्वत आहे... आणि राहीलही.
भारतात लोकांना जसे सोन्याचे आकर्षण आहे तसेच फुलांच्या बाबतीत गुलाबांचे आहे. कोणताही सण, उत्सव, समारंभ असला की, फुलांमध्ये सर्वाधिक मागणी गुलाबाला असते. त्यात लाल गुलाब हे तर साक्षात प्रेमाचे प्रतीक ! कॉलेजमध्ये एखादी व्यक्ती आवडली आणि तिच्यावर आपले प्रेम आहे, याचा जर संकेत द्यायचा असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला तिच्या वाढदिवशी पिवळ्या रंगाचा गुलाब दिला जातो आणि तो स्वीकारला गेला तर मग व्हॅलेंटाईनला हमखास लाल गुलाब दिला जातो. प्रेमात किंमत मोजली जात नाही. पण जसा फळांचा राजा आंबा हा चवीच्या आणि त्यामुळेच किमतीच्या बाबतीत आपला आब राखून आहे तसेच गुलाबाचे आहे. त्यामुळे या लेखाच्या निमित्ताने गुलाबाच्या बाजाराबद्दलही थोडे जाणून घेऊयात.
थंड प्रदेशात फुलणाऱ्या गुलाबाचे भारतात सर्वाधिक उत्पादन होते ते जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगळुरू आणि पुणे येथे. आजच्या घडीला भारतीय बाजारात लाल गुलाबांची उलाढाल ही साधारणपणे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये निर्यातीचा देखील वाटा आहे. आता व्हॅलेंटाईन डे या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर मुंबई शहरात या दिवशी नेमकी किती उलाढाल होते, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. तरीही या दिवशी गुलाबाच्या विक्रीचा ट्रेंड हा काहीसा वेगळा असल्याचे व्यापारी सांगतात. लाल गुलाबाचा आकार, त्याचा ताजेपणा, कळीदार ते पूर्ण फुललेले फुल असेल तर एकाची किंमत किमान ६० रुपये. परंतु, सहसा एक फुल विकण्यास व्यापारी उत्सुक नसतात. मध्यम आकाराच्या किमान चार फुलांचा पुष्पगुच्छ किमान २५० रुपयांपासून सुरू होताे. ही किंमत पुढे १० हजारांपर्यंत देखील जाते. कारण फुलांच्या दर्जानुसार किंमत ठरते.
१० हजार रुपयांच्या पुष्पगुच्छामध्ये ५० फुले असतात. त्यांची किंमत इतकी जास्त, पण त्यांचा दर्जा कसा ओळखायचा? असा प्रश्न केला असता फुल व्यापारी किरण शिंदे म्हणाले, ‘तुमच्यासमोर जर विविध दर्जाची फुले ठेवली तर १० हजार रुपयांना आम्ही जी फुले विकतो त्याची किंमत तितकी का आहे हे तुम्हाला केवळ नजरेनेच समजेल. त्यासोबत त्याची रचना आम्ही ज्या पद्धतीने करतो तेही विलक्षण आहे. ती फुले, त्यांचा टवटवीतपणा टिकतातही आठवडाभर. ज्यांना परवडते ते लोक नक्की घेऊन जातात. आमच्यासाठी हा व्यवसाय आहे. पण छोटी फुले घेण्यासाठी येणारे लोक जेव्हा घासाघीस करतात, तेव्हा त्यांच्या प्रेमाचा मार्ग प्रशस्त व्हावा, यासाठी प्रसंगी आम्हीदेखील दोन पैसे कमी घेतो.’ तर, असे आहे व्हॅलेंटाईन आणि लाल गुलाबाचे प्रेम प्रकरण !
Web Summary : Valentine's Day sees enduring rose demand despite digital trends. Red roses symbolize love, driving a significant market. Indian rose trade is worth approximately ₹1,500-2,000 crore, with prices varying based on quality and bouquet size.
Web Summary : डिजिटल रुझानों के बावजूद वैलेंटाइन डे पर गुलाब की मांग बनी रहती है। लाल गुलाब प्यार का प्रतीक है, जो एक महत्वपूर्ण बाजार चलाता है। भारतीय गुलाब का कारोबार लगभग ₹1,500-2,000 करोड़ का है, कीमतें गुणवत्ता और गुलदस्ते के आकार के आधार पर अलग-अलग होती हैं।