Join us

मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:23 IST

US Federal Reserve Interest Rate Cut: कामगार बाजाराबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट कपात करण्याची घोषणा केली, या वर्षाच्या अखेरीस आणखी दोन दर कपातीचे संकेत दिले.

US Federal Reserve Cut Interest Rate: भारतासह सर्वांना टॅरिफचा धाक दाखवणारी अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. यातून वाचवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक, यू.एस. फेडरल रिझर्व्हने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने आपल्या पतधोरण समितीच्या बैठकीत बेंचमार्क व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे, आता अमेरिकेत कर्ज घेणे थोडे स्वस्त होईल, ज्याचा उद्देश आर्थिक घडामोडींना चालना देणे हा आहे. या निर्णयाचा परिणाम भारतावरही होणार आहे.

पुढील काळातही व्याजदरात आणखी दोन वेळा कपात होण्याची शक्यता फेडरल रिझर्व्हने वर्तवली आहे. अमेरिकेतील नोकरीच्या बाजारात वाढलेली अस्थिरता आणि बेरोजगारीचा संभाव्य धोका लक्षात घेता, सरकारने गुंतवणूक आणि एकूणच ग्राहकांकडून होणारी खरेदी वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

०.२५ टक्के कपात : फेडरल ओपन मार्केट कमिटीने ११-१ च्या बहुमताने हा निर्णय घेतला असून, बेंचमार्क व्याजदर ४.००% ते ४.२५% च्या दरम्यान आणला आहे. एका सदस्याचा (स्टीफन मिरान) विरोध वगळता, हा निर्णय जवळपास सर्वानुमते झाला आहे.

भारतावर होणारा परिणाम

अमेरिकेतील या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर थेट परिणाम दिसून येऊ शकतो.

  • गुंतवणूक वाढेल: अमेरिकेत कर्ज घेणे स्वस्त झाल्यामुळे, विदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारत आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठांकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे, भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.
  • शेअर बाजारात तेजी: विदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे, भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी येऊ शकते. यामुळे, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
  • रुपयावर परिणाम: अमेरिकेत व्याजदर कमी झाल्याने रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य वाढू शकते. याचा भारताच्या आयात-निर्यातीवर सकारात्मक परिणाम होईल.
  • वस्तूंच्या किमतीत चढ-उतार: या बदलांमुळे सोने, चांदी आणि पेट्रोलियम पदार्थांसारख्या जागतिक वस्तूंच्या किमतीतही चढ-उतार पाहायला मिळू शकतो.

वाचा - फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

अमेरिकी बाजारातील प्रतिक्रियाव्याजदर कपातीनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्ये ०.६५% ची वाढ झाली. मात्र, दुसरीकडे एस अँड पी ५०० (S&P 500) ०.२% आणि नॅसडॅक कंपोझिट ०.४% नी घसरले. ही संमिश्र प्रतिक्रिया दर्शवते की, बाजारात अजूनही अनिश्चितता कायम आहे.

टॅग्स :अमेरिकाअर्थव्यवस्थाडोनाल्ड ट्रम्पबँकिंग क्षेत्र