लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने दुग्ध उत्पादन (डेअरी) क्षेत्र अमेरिकेसाठी खुले केल्यास भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विश्लेषण अहवालात म्हटले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार समझोत्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. कृषी आणि दुग्ध उत्पादन ही क्षेत्रे दोन्ही देशांतील वाटाघाटींत मोठा अडथळा ठरली आहेत. ही दोन्ही क्षेत्रे भारताने आयातीसाठी खुली करावीत, असा दबाव अमेरिकेकडून आणला जात आहे. भारताने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे अंतरिम व्यापार करार अडला आहे.
आठ कोटी लोकांना थेट रोजगार देते हे क्षेत्रभारतातील डेअरी व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राष्ट्रीय सकळ मूल्य वर्धनात (जीव्हीए) डेअरीचा हिस्सा २.५ ते ३ टक्के आहे. ७.५ लाख कोटी ते ९ लाख कोटी रुपये उत्पन्न डेअरी क्षेत्रातून भारतीय शेतकऱ्यांना होते. याशिवाय हे क्षेत्र ८ कोटी लोकांना थेट रोजगार देते.
१५ टक्के उतरतील किमतीअहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांच्या खुल्या आयातीस परवानगी दिल्यास भारताच्या डेअरी उत्पन्नास थेट फटका बसेल. उत्पन्न तर बुडेलच; पण रोजगारही बुडेल. दुधाच्या किमती १५ टक्क्यांनी उतरतील, त्यातून १.०३ लाख कोटी रुपयांचा तोटा होईल. दूध उत्पादक छोटे शेतकरीच याचे बळी ठरतील.
भारताचे पथक पुन्हा अमेरिकेला : भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सोमवार ते गुरुवारदरम्यान चालणाऱ्या पुढील फेरीतील चार दिवसीय चर्चेसाठी भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचे पथक वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.