Join us  

मोदी सरकारला ‘अच्छे दिन’! एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटींचा GST जमा; नव्या विक्रमाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 7:23 PM

सन २०२२ मध्ये जीएसटी संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सावरताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून वस्तू आणि सेवा कर (GST) मोठ्या प्रमाणात जमा होताना दिसत आहे. एकामागून एक विक्रम नोंदवल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा जीएसटी जमा झाल्याच्या रकमेने नवा रेकॉर्ड केला आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी पोटी १.६८ कोटी रुपये जमा झाले आहेत. 

देशात एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर गोळा करण्याबाबत आतापर्यंतचा विक्रम झाला आहे. एप्रिल २०२२ मध्ये एकूण १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने १ मे रोजी याबाबत निवेदन दिलंय. एकूण मासिक जीएसटी संकलनात पहिल्यांदाच १.५ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. १ लाख कोटी रुपये जीएसटी संकलनाची ही सलग दहावी वेळ आहे. 

मार्चमध्येही १.४२ लाख कोटी रुपयांचे विक्रमी कर संकलन एप्रिल २०२२ मध्ये १ लाख ६७ हजार ५४० लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झालं आहे. यापैकी ३३ हजार १५९ कोटी रुपये सीजीएसटी, ४१ हजार ७९३ कोटी रुपये एसजीएसटी, ८१ हजार ९३९ कोटी रुपये आयजीएसटी आणि १० हजार ६४९ कोटी रुपये सेसचा समावेश आहे. आयजीएसटीच्या रकमेत ३६ हजार ७०५ कोटी रुपयांच्या आयात कराचा आणि सेसमध्ये ८५७ कोटी रुपयांच्या आयात कराचा समावेश आहे. मार्च २०२२ मध्ये १.४२ लाख कोटी रुपयांचे विक्रमी कर संकलन झाले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये हा विक्रम मोडीत निघून नवा विक्रम प्रस्थापित झाला. एप्रिलमध्ये २५,००० कोटी रुपयांनी जीएसटी संकलन वाढले.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १४.८३ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हेच जीएसटी संकलन ११.३७ लाख कोटी रुपये इतके होते. म्हणजेच २०२२ मध्ये जीएसटी संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाली. 

टॅग्स :जीएसटीकेंद्र सरकारनिर्मला सीतारामन