Join us

Union Budget 2022 Agriculture and Farmers : आता ड्रोनचा वापर शेतीसाठी सुद्धा होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:20 IST

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जाणार आहे. यासाठी शेतकरी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे निर्मला सितारामण यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) बळीराजासाठी काही घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सेंद्रिय, झीरो बजेट शेतीला प्रोत्साहत देण्यासह 9 लाख हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली आणण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जाणार आहे. यासाठी शेतकरी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे निर्मला सितारामण यांनी सांगितले. 

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारामण यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही केला जाणार आहे. 'किसान ड्रोन'चा वापर केला जाईल. यामुळे पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदी, कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देणे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली.

 

याचबरोबर, निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2021-22 मध्ये रब्बी हंगाम आणि खरिपाच्या हंगामामध्ये भात आणि गव्हाची खरेदी 1208 मेट्रिक टन एवढी झाली. 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून ही धान्य खरेदी करण्यात आली. तसे त्याच्या मोबदल्यामध्ये 2 कोटी 37 लाख कोटी रुपये एमएसपीच्या आधारावरील डायरेक्ट पेमेंट सरकारकडून देण्यात आले.

देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर चाललेले शेतकरी आंदोलन, देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री शेतीक्षेत्राबाबत काय घोषणा करतात याकडे कृषीक्षेत्रातील जाणकारांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :अर्थसंकल्प 2022शेती क्षेत्रशेतीनिर्मला सीतारामन