Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:20 IST

या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला असून, या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे. पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर ५.२ टक्के असून, महिलांमध्ये हे प्रमाण ५ टक्के आहे. या काळात देशभरात १५-२९ वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के होता. शहरी भागात बेरोजगारीचा दर १७.२ टक्के होता, तर ग्रामीण भागात तो १२.३ टक्के होता.

१५-२९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर देशभरात (ग्रामीण आणि शहरी) १४.४ टक्के होता, तर शहरांमध्ये तो २३.७ टक्के आणि खेड्यांमध्ये १०.७ टक्के होता. देशात १५-२९ वयोगटातील पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर १३.६ टक्के नोंदवला गेला, तर शहरांमध्ये तो १५ टक्के आणि खेड्यांमध्ये १३ टक्के होता. एप्रिल २०२५ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये कामगार शक्ती सहभाग दर ५५.६ टक्के होता, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

 

टॅग्स :बेरोजगारी