Tariff Side Effect: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ (आयात शुल्क) लादण्याची घोषणा केली आहे. मात्र, असा निर्णय घेऊन ट्रम्प यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतल्याचे समोर आलं आहे. याचा परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांना नाही, पण, अमेरिकेच्या जनतेला मात्र सोसावे लागणार आहे. टॅरिफ निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, पण अमेरिकेची अर्थव्यवस्था मात्र धोक्यात येऊ शकते, असा मोठा दावा करण्यात आला आहे. एसबीआयच्या एका संशोधन अहवालानुसार, ट्रम्प यांनी लावलेल्या या टॅरिफचा फटका भारतापेक्षा अमेरिकेलाच जास्त बसू शकतो.
ट्रम्प यांचा टॅरिफचा सापळाडोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या "अमेरिका फर्स्ट" धोरणांतर्गत टॅरिफचा वापर करून अनेक देशांना व्यापारी करार करण्यास भाग पाडले आहे. आतापर्यंत त्यांनी ३३ देशांशी अशा प्रकारे व्यापारी करार केले आहेत. मात्र, भारत या सापळ्यात अडकलेला नाही. ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याची घोषणा केली असली तरी, भारत सरकारचे म्हणणे आहे की याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. सर्वात वाईट परिस्थितीत जीडीपीमध्ये फक्त ०.२% ची घसरण होऊ शकते.
भारताची मोठी बाजारपेठ सोडणे अमेरिकेला महागात पडेल
- एसबीआयच्या अहवालानुसार, भारतासारखी मोठी बाजारपेठ सोडणे अमेरिकेसाठी एक 'वाईट व्यावसायिक निर्णय' ठरू शकतो.
- ग्राहक बाजारपेठ: भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. २०३० पर्यंत त्याची ग्राहक बाजारपेठ ४६% नी वाढेल. एवढी मोठी बाजारपेठ गमावणे अमेरिकेला परवडणारे नाही.
- अमेरिकन कंपन्या: भारतात अमेझॉनचा ३२%, ॲपलचा २३%, युट्यूबचा ५०० कोटी वापरकर्त्यांचा आणि फेसबुक, इंस्टाग्राम, गुगलचा खूप मोठा बाजार आहे. टॅरिफमुळे या कंपन्यांनाही नुकसान होऊ शकते.
अमेरिकेला मंदीचा धोका आणि महागाईचा बॉम्बट्रम्प यांनी व्यावसायिक नेते म्हणून घेतलेला हा निर्णय अमेरिकेसाठीच उलट ठरू शकतो. अमेरिकन अर्थव्यवस्था आधीच महागाई, मंदावलेली जीडीपी वाढ आणि मंदीचा सामना करत आहे.
- जीडीपीवर परिणाम: २०२५ च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेची जीडीपी वाढ फक्त १.३% होती, जी गेल्या वर्षी २.८% होती. टॅरिफमुळे अमेरिकेला आर्थिक मंदीत अडकण्याचा धोका आहे.
- महागाईचा बोजा: एसबीआयच्या अहवालानुसार, टॅरिफमुळे अमेरिकेतील महागाई २०२६ पर्यंत २% च्या लक्ष्यापेक्षा जास्त राहील. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अल्पावधीत, एका अमेरिकन कुटुंबावरील सरासरी खर्च २,४०० डॉलर (सुमारे २,०९,२८७ रुपये) ने वाढेल.
वाचा - मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
ट्रम्प यांनी भारताला दबाव आणण्यासाठी टॅरिफचा वापर केला असला, तरी त्याचा सर्वाधिक फटका त्यांच्याच देशाला बसण्याची शक्यता आहे. या टॅरिफमुळे अमेरिका कर्ज आणि महागाईच्या विळख्यात अडकू शकते, तर भारताला त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असा अंदाज आहे.