Join us

ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:11 IST

Trump Chip Tariffs : रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. ५० टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंर ट्रम्प यांनी आता सेमिकंडक्टर उद्योगाला लक्ष्य केलं आहे.

US Tariffs Plan On Semiconductor : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टॅरिफ (आयात शुल्क) लादण्याबाबत एकामागून एक कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावल्यानंतर, तो आता ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या वाढीव दरासाठी भारताला २० दिवसांचा वाढीव कालावधी मिळाला आहे, तर २५ टक्के टॅरिफ आजपासून (७ ऑगस्ट २०२५) लागू झाले आहेत. या सगळ्यामध्ये, ट्रम्प यांनी आता चिप्सवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याने जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो, कारण भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

चिप्सवर १०० टक्के टॅरिफ का?रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर यापूर्वीच अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला होता. आता ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर चिप्सवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा करून बाजारात पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सध्या अनेक देश सेमीकंडक्टर उद्योगात काम करत आहेत. मात्र, भारत या क्षेत्रात वेगाने एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येत आहे. भारत सरकार देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, ट्रम्प यांचा हा निर्णय भारताच्या या प्रयत्नांना धक्का देऊ शकतो.

भारतावर काय परिणाम होईल?जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिप्सवर १०० टक्के कर लावला, तर त्याचा भारतासह तैवान, जपान आणि चीनवरही खोलवर परिणाम होईल. एका अहवालानुसार, भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ पुढील पाच वर्षांत १०० ते ११० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. गेल्या तीन वर्षांत या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.

२०२२ मध्ये भारताची चिप बाजारपेठ सुमारे २३ अब्ज डॉलर्स होती.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ती ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.या तुलनेत अमेरिकेची चिप बाजारपेठ १३० अब्ज डॉलर्स आणि चीनची १७७.८ अब्ज डॉलर्स होती.

वाचा - ५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ वेगाने वाढत असताना, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगावरही परिणाम होऊ शकतो, कारण चिप्स हा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा महत्त्वाचा भाग आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजगारावर होणार आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्धतंत्रज्ञानअमेरिका