Join us

ट्रम्प टॅरिफमुळे भारतातील 'या' उद्योगांना बसणार फटका; थेट सर्वसामान्यांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:39 IST

trump reciprocal tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर २ एप्रिलपासून रेसिप्रोकल शुल्क लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. टॅरिफ देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे.

trump reciprocal tariffs : गेल्या काही दिवसापासून ज्या गोष्टीची भिती होती, अखेर ती सत्यात उतरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जसास तसा कर लादला जाणार आहे. याचा फटका चीन, कॅनडा यांच्यासोबत भारतालाही बसणार आहे. येत्या २ एप्रिल २०२५ पासून हे दर लागू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प टॅरिफ यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम करेल. कारण अमेरिका भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या शुल्कानंतर कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसले? याचा आढावा घेऊ.

आयटी क्षेत्राला मोठा धक्काभारताचे आयटी क्षेत्र अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. इथल्या बहुतेक कंपन्या अमेरिकेला सेवा देतात. ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे आयटी कंपन्यांना नवीन प्रकल्प मिळण्यात अडचण येऊ शकते. H-1B व्हिसाच्या अटी कठोर झाल्यास भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत काम करणे देखील कठीण होईल, ज्यामुळे व्यवसाय वाढीवर परिणाम होऊ शकतो.

फार्मास्युटिकल क्षेत्रावर परिणामभारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. भारतीय औषध कंपन्या (सन फार्मा, डॉ. रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन) अमेरिकन बाजारातून अब्जावधी डॉलर्स कमावतात. ट्रम्प प्रशासनाने भारतीय औषधांवर जास्त शुल्क लावल्यास त्यांच्या किमती वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर होईल. याव्यतिरिक्त, जर एफडीए (यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन) नियम कडक केले तर भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यात क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

ऑटोमोबाईल क्षेत्रासमोर आव्हानसध्या भारताच्या ऑटो क्षेत्रात मंदी सुरू आहे. अशा परिस्थितीत ट्रॅम्प टॅरिफने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मारुती सुझुकी यांसारख्या कंपन्यांसाठी अमेरिका ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवल्यास भारतीय कार कंपन्यांना अमेरिकेत कार विकणे कठीण होईल. इलेक्ट्रिक वाहन आणि वाहन घटक क्षेत्रालाही धक्का बसू शकतो, ज्यामुळे गुंतवणुकीत घट होऊ शकते.

वस्त्रोद्योगावर परिणामभारतीय कापड आणि वस्त्र उद्योग अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. ट्रम्प प्रशासनाने भारतीय कापडावर जास्त दर लावल्यास भारतीय कंपन्या किंमतीच्या स्पर्धेत मागे पडू शकतात. यामुळे शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या स्पर्धकांना फायदा होऊ शकतो.

स्टील आणि ॲल्युमिनियम क्षेत्रावर परिणामट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादनांवरील शुल्क वाढवण्यात आले, त्यामुळे भारतीय निर्यातदारांचे मोठे नुकसान झाले. आता दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा त्यांनी टॅरिफचं हत्यार उगारलं आहे. याचा फटका भारताच्या पोलाद आणि धातू उद्योगाला मोठा फटका बसू शकतो.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाअर्थव्यवस्था