Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:52 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीमध्ये मोठी घोषणा केली. त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीमध्ये मोठी घोषणा केली. पुढील आठवड्यापासून स्टीलवरील शुल्क २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा फायदा जपान निप्पॉन स्टील आणि अमेरिकन स्टीलला होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. "स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात येणार आहे. हा निर्णय ४ जूनपासून लागू होईल. आमचा स्टील आणि अॅल्युमिनियम व्यवसाय परत येत आहे. आमच्या स्टील आणि अॅल्युमिनियम कामगारांसाठी ही चांगली बातमी आहे. मेक अमेरिका ग्रे अगेन," असं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिलं.

चीनवर केली टीका

त्यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत १४ अब्ज डॉलर्स येतील. त्याच वेळी ७०,००० लोकांना नवीन नोकऱ्या मिळतील, असा ट्रम्प यांनी केलाय. "मला खात्री आहे की ज्यांनी यात गुंतवणूक केली आहे ते खूप आनंदी असतील. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोणीही तुमचा उद्योग चोरू शकत नाही. आम्हाला अमेरिकेचे भविष्य शांघायच्या स्वस्त स्टीलनं उभारायचं नाही. आम्हाला ते पीटर्सबर्गच्या ताकदीनं आणि अभिमानानं उभारायचं आहे," असं म्हणत त्यांनी चीनवर टीकेचा बाण सोडला.

भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार

भारतावर काय परिणाम होणार?

स्वस्त स्टीलच्या ओव्हरडंपिंगला भारत बळी पडू शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम देशांतर्गत मार्जिन आणि किमतींवर होऊ शकतो. हा परिणाम कमी करण्यासाठी, भारतानं चीन, व्हिएतनाम, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या काही स्टील उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क लादलंय.

या शेअर्सवर होऊ शकतो परिणाम

शुक्रवारी, टाटा स्टील लिमिटेडचे ​​शेअर्स बीएसईवर १.२९ टक्क्यांनी घसरल्यानंतर १६१ रुपयांवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत टाटा स्टीलचे शेअर्स १७ टक्क्यांनी वधारलेत. शुक्रवारी जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स देखील घसरणीसह बंद झाले. काल बीएसईवर १.२२ टक्क्यांनी घसरल्यानंतर हा शेअर ९९३.८० रुपयांवर बंद झाला. या वर्षी जेएसडब्ल्यू स्टीलच्या किमती ९ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्ध