Train Ticket Rules: भारतीय रेल्वे हे प्रवासाचं सर्वात लोकप्रिय साधन आहे. दररोज दोन कोटींहून अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात. यातील अनेक लोक असेही आहेत ज्यांच्यासोबत मुलंही प्रवास करतात. रेल्वेने मुलांच्या भाड्याबाबत काही नियम तयार केलेत. वयोमानानुसार काही मुलांना ट्रेनमध्ये तिकीट (Train tickets for children) घ्यावं लागत नाही तर, काहींकडे अर्धे तिकीट घ्यावं लागतं. गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी प्रत्येक रेल्वे प्रवाशाला रेल्वेच्या तिकिटांशी संबंधित नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
भारतीय रेल्वे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवासाची सुविधा देते. ही सुविधा जनरल आणि आरक्षित अशा दोन्ही डब्यांमध्ये उपलब्ध आहे. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांना स्वतंत्र बर्थ मिळत नाहीत. जर एखाद्या पालकाला आपल्या ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी बर्थ हवा असेल तर त्याला पूर्ण भाडं द्यावं लागेल.
अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?
यांना लागणार अर्ध भाडं
५ ते १२ वर्षांखालील मुलांना रेल्वेचं अर्ध तिकीट आकारलं जाते. म्हणजेच अर्धच भाडं द्यावं लागणार आहे. तिकिटाचं आरक्षण करताना मुलांसाठी जागा मागितली तर पूर्ण भाडं भरावं लागेल. सीटची मागणी न केल्यास अर्ध भाडं आकारलं जाईल. चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लास, सेकंड क्लास सीटिंग आणि एक्झिक्युटिव्ह क्लास एसी कॅटेगरीत एनएसओबीचा पर्याय (नो सीट ऑप्शन) मुलांसाठी उपलब्ध नाही. म्हणजेच या क्लासेसमध्ये प्रवास करण्यासाठी मुलांसाठी पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे.
१२ वर्षांच्या मुलांसाठी पूर्ण तिकीट
जे मुल १२ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचं असेल त्यांना पूर्ण तिकिटच काढावं लागेल. अर्ध्या म्हणजेच हाफ तिकिटाचा नियम ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठीच आहे.
कागदपत्रे दाखवावी लागतात
रेल्वेच्या या नियमाचा फायदा घ्यायचा असेल तर मुलांसाठी तिकीट बुक करताना त्यांचा जन्म दाखला आणि इतर ओळखपत्रं दाखवावं लागेल. मुलांचं खरं वय कळावं आणि मुलांचं वय लपवून लोक या नियमाचा गैरफायदा घेऊ नयेत, यासाठी ही कागदपत्रं मागितली जातात. जर तुमचं मूल ५ किंवा ५ वर्षांपेक्षा जास्त वयाचं असेल आणि तुम्ही त्याचे तिकीट न काढता त्याच्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि तुम्हाला पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.