Join us

चीनबरोबरच्या व्यापार तुटीमध्ये झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:09 IST

गतवर्षात भारताची निर्यात वाढली : आयातही घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतामधून चीनला होणाऱ्या निर्यातीमध्ये सन २०२० मध्ये १६.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षात भारताने चीनला २०.८७ अब्ज डॉलरची निर्यात केली गेली. यामध्ये लोखंड तसेच पोलाद, ॲल्युमिनियम, तांबे यांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने भारत आणि चीनदरम्यान मागील वर्षामध्ये झालेल्या निर्यातीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारताकडून चीनला २०.८७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. त्याआधीच्या वर्षामध्ये १७.९ अब्ज डॉलरची निर्यात केली गेली होती. याचा अर्थ गतवर्षामध्ये निर्यातीमध्ये १६.१५ टक्के वाढ झाली आहे.त्याचप्रमाणे सन २०२० मध्ये भारत-चीन व्यापारातील तोटा १९.३९ टक्क्यांनी कमी झाला आहे. सन २०१९ मध्ये व्यापारातील तोटा ५६.९५ अब्ज डॉलर होता. तो सन २०२० मध्ये ४५.९१ अब्ज डॉलरवर आला आहे. व्यापारामधील तोटा कमी होण्याला  आयात घटल्याचा फायदा मिळाला आहे. २०१९ मध्ये चीनमधून ७४.९२ अब्ज डॉलरची आयात झाली होती. २०२० मध्ये १०.८७ टक्क्यांनी घट होऊन आयात ६६.८८ अब्ज डॉलरवर आली आहे. 

साखरेच्या निर्यातीमध्ये झाली वाढभारतामधून चीनला साखर, सोयाबीन तेल तसेच वनस्पती तेलाच्या निर्यातीमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मात्र आंबे, ताजी द्राक्षे, चहा आणि माशांचे तेल यांच्या निर्यातीमध्ये मात्र घट झाली आहे. भारतीय निर्यातकांचा महासंघ फिओचे अध्यक्ष एस. के. सराफ यांनी या आकडेवारीबाबत सांगितले की, भारतामध्ये देशांतर्गत उद्योगधंदे हे अधिक प्रगती करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :चीन