जीएसटीतील सुधारणेनुसार, तंबाखू, सिगारेट आणि कोल्ड्रिंक्स सारख्या हानिकारक उत्पादनांना ४०% जीएसटी लावण्यात आला आहे. मात्र, या उत्पादनांवर आता आणखी कर लागू शकतो, असे वृत्त आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तात, सरकार यांवरील कर आणखी वाढवू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
सरकार, तंबाखू आणि सिगारेट सारख्या हानिकारक वस्तूंवरील कराचा प्रभाव सध्याच्या पातळीवर कायम ठेवण्यासाठी ४०% जीएसटी व्यतिरिक्त 'सेस'देखील लावू शकते. यासंदर्भात बोलताना, केंद्रीय अप्रत्यक्ष कर तथा सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल म्हणाले, जीएसटी अंतर्गत, जास्तीत जास्त ४०% कर लादता येतो. यामुळे, उर्वरित कर, सध्याच्या पातळीवर राखण्यासाठी काही व्यवस्था केली जाईल.
मात्र, त्यांनी त्या व्यवस्थेसंदर्भात अधिक माहिती दिली नाही. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे म्हणाले, जर कायदेविषयक सुधारणा अथवा विधेयकाची आवश्यक असेल तर, त्या दृष्टीनेही विचार केला जाईल.
लक्झरी कार आणि बाईकवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही -अग्रवाल यांनी असेही स्पष्ट केले की, लक्झरी कार, लक्झरी बाईक आणि इतर सुपर लक्झरी वस्तूंवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही. त्यावर केवळ ४०% करच आकारला जाईल.
२८% चा हानिकारक उपकर डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता -याच बरोबर, नवीन जीएसटी सुधारणे अंतर्गत, हानिकारक वस्तू आणि सुपर लक्झरी वस्तूंवर सध्याच्या २८% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. २८% चा हानिकारक उपकर डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, तर पूर्वी असा अंदाज होता की तो या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत संपेल.