Join us  

तीन आठवड्यांच्या घसरणीला लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 12:32 AM

जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण असताना जून महिन्यातील एफ अ‍ॅण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती आशादायक वातावरणामध्ये पार पडली.

- प्रसाद गो. जोशीजगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण असताना जून महिन्यातील एफ अ‍ॅण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती आशादायक वातावरणामध्ये पार पडली. याच बरोबर बाजारामध्ये स्थानिक तसेच परकीय वित्तसंस्था गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पुढे आलेल्या दिसून आल्या. या सर्व घटकांचा एकत्रित प्रभाव बाजारावर पडून निर्देशांकांमध्ये वाढ झाली. अर्थसंकल्पपूर्व सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढून घसरणीला ब्रेक लागला.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ घसरण होऊन झाला. यानंतर मात्र निर्देशांक वाढता राहिला. सप्ताहाच्या अखेरीस बाजारात पुन्हा घसरण झाली. संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये ३९,८१७.२२ ते ३८,९४६.०४ अंशांदरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३९,३९४.६४ अंशांवर बंद झाला. सप्ताहात त्यामध्ये २००.१५ अंश म्हणजे ०.५ टक्कयांनी वाढ झाली.राष्टÑीय शेअर बाजारातही संमिश्र वातावरण होते. येथील निर्देशांकात (निफ्टी) ६४.७५ अंशांची (म्हणजेच ०.६ टक्के) अशी किरकोळ वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११,७८८.८५ अंशांवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकामधील आय.टी निर्देशांकाचा अपवाद सोडला तर सर्वच निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले आहेत. मिडकॅप निर्देशांक १८३.७५ अंशांनी वधारून १४,८०८.३४ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्येही २१८.३६ अंशांनी वाढ होऊन तो १४,२३९.३३ अंशांवर बंद झाला.बिगर बॅँकींग आस्थापनांना जाणवत असलेली रोकड चणचण आणि उशिराने आलेला मान्सून यामुळे बाजारामध्ये नकारात्मक वातावरण होते. त्यातच आंतरराष्टÑीय बाजारांमध्येही फारशी हालचाल नव्हती. आगामी अर्थसंकल्पामुळेही गुंतवणूकदार सावध असल्याने बाजारात मर्यादित प्रमाणातच व्यवहार झाले. मात्र परकीय व देशी वित्तसंस्थांनी केलेल्या खरेदीमुळे बाजार वधारलेले दिसले. जी २०च्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे अमेरिका-चीन व्यापाराबाबतही निर्णय अपेक्षित आहे.

टॅग्स :शेअर बाजार