Join us

ज्यांना ५० लाखांचे पॅकेज दिले, ते फक्त पीपीटीतज्ज्ञ निघाले; स्टार्टअप कंपनीच्या मालकाची व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:03 IST

ही मुले केवळ पीपीटी बनविण्यात तरबेज होती. वास्तविक पीपीटीचे काम तर आता जेमिनी आणि चॅटजीपीटी मोफत करून देतात.

नवी दिल्ली : आम्ही देशातील नामांकित खासगी महाविद्यालयांतून एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट व टेक पदवीधारक तीन विद्यार्थ्यांना ४० ते ५० लाख रुपयांचे पॅकेज देऊन आमच्या कंपनीत भरती केले, पण ज्या पदांसाठी भरती करण्यात आले होते त्यातील आवश्यक गोष्टींचे कोणतेही ज्ञान त्यांना नसल्याचे आढळून आले; ते फक्त पीपीटी तज्ज्ञ होते, अशी व्यथा एका स्टार्टअप कंपनीच्या संस्थापकाने व्यक्त केली आहे.

स्कँडलस फूड्सचे संस्थापक संकेत एस. यांनी ही खंत व्यक्त केली आहे. लिंक्ड इनवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, आम्ही लठ्ठ पॅकेज देऊन निवडलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एमबीए पदवीधरास नफा, तोटा आणि रोख प्रवाह यांसारख्या मूलभूत संकल्पना माहिती नव्हत्या. हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीधरास आंबवण्याचे मूलभूत प्रमाण वगैरेची प्रारंभिक माहितीही नव्हती. ही मुले केवळ पीपीटी बनविण्यात तरबेज होती. वास्तविक पीपीटीचे काम तर आता जेमिनी आणि चॅटजीपीटी मोफत करून देतात.