Join us

धक्कादायक! एका देशामुळे संपूर्ण जग खाद्यतेल टंचाईच्या उंबरठ्यावर; भारतालाही चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:35 IST

इंडोनेशियाकडून खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांत चीन व भारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला असतानाच, आता इंडोनेशियाने खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे संपूर्ण जग खाद्यतेल टंचाईच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. भारत एकूण वापरापैकी ५० टक्के खाद्यतेल इंडोनेशियाकडून आयात करतो.

स्थानिक टंचाई आणि वाढत्या किमती यामुळे इंडोनेशियाने तेल निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात सुरू असलेल्या ‘पीक संरक्षण वादा’ला त्यामुळे आणखी बळ मिळाले आहे. जगातील एकूण वनस्पती तेल निर्यातीपैकी एक तृतीयांश निर्यात एकटा इंडोनेशिया करतो. त्यामुळे इंडोनेशियाच्या खाद्यतेल निर्यात बंदीचा मोठा फटका जगाला बसणार आहे. इंडोनेशियाकडून खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांत चीन व भारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात २४० रूपये प्रति लिटर सद्या खाद्यतेल दर आहेत.  

नेमकी कारणे काय?युक्रेन युद्धानंतर सूर्यफूल तेलाच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत. त्यातच प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्यामुळे खाद्यतेल टंचाईची भीती वाढली आहे. दुष्काळामुळे दक्षिण अमेरिकेतील सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. या सर्वांचा परिणाम अमेरिका व इतर प्रगत देशांत लोकप्रिय असलेल्या सलाड ड्रेसिंग व मेयोनीज यांसारख्या पदार्थांच्या उत्पादनांवर होणार आहे. पामतेलाअभावी सोयाबीन, सूर्यफूल व मोहरी यांसारख्या तेलाचा महागडा पर्याय उत्पादकांना स्वीकारावा लागणार आहे. 

इंडोनेशियासोबत चर्चा करा : खाद्यतेल संघटनानिर्यातीवर बंदी घातल्याने सरकारने तत्काळ इंडोनेशियाशी चर्चा करावी. अन्यथा त्याचा भारताला थेट फटका बसणार असल्याचे खाद्यतेल उद्योग संघटना सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) ऑफ इंडियाने म्हटले आहे.