Join us

नकलीचा बाजार जोरात, ५००च्या नकली नोटा ३१७% वाढल्या; अर्थमंत्रायलाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 06:48 IST

२०२२ या आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या नकली नोटांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली होती.

नवी दिल्ली - देशातील नकली नोटांवर अंकुश लावून याद्वारे होणारे गैरव्यवहार थांबण्यासाठी केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नकली नोटांचे प्रमाण कमीही झाले होते; परंतु मागील काही दिवसांमध्ये व्यवहारात नकली नोटांचा वापर वाढला आहे. पाचशे रुपयांच्या नकली नोटांचे प्रमाण तब्बल ३१७ टक्के वाढल्याचे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. 

अर्थ मंत्रालयाच्या वतीने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ या आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या नकली नोटांची संख्या २१,८६५ दशलक्ष इतकी होती. २०२३ या आर्थिक वर्षात नोटांची ही संख्या वाढून ९१,११० दशलक्षांवर पोहोचली; परंतु २०२४ च्या आर्थिक वर्षात आतापर्यंत यात १५ टक्के घट झाली असून, नोटांची संख्या ८५,७११ दशलक्ष इतकी झाली आहे. २०२२ या आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या नकली नोटांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली होती.

सध्या ५०० च्या नोटांचे प्रमाण किती?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये ५०० च्या नोटांचे २०२३ या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत ८६.५ टक्के होणार होते. २०२२ च्या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ७७.१ टक्के इतके होते.

२००० च्या नोटांचे काय?

२०२१ मध्ये या नकली नोटा ३९,४५३ दशलक्ष इतक्या होत्या; तर २०२२ मध्ये या दुपटीने वाढून ७९,६६९ दशलक्षांवर पोहोचल्या होत्या. ही वाढ १०२ टक्के इतकी होती. सन २०२४ या आर्थिक वर्षात २००० च्या नकली नोटांची संख्या १६६ टक्के वाढली होती. २०२३ मध्ये २००० च्या नकली नोटा ९,८०६ दशलक्ष इतक्या होत्या. 

इतर मूल्यांच्या नकली नोटांमध्ये ३० टक्के घट

या ५०० च्या नकली नोटांचे प्रमाण वाढले असतानाच अन्य मूल्यांच्या नकली नोटांचे प्रमाण मात्र ३० टक्क्यांनी घटले आहे. २०२९ मध्ये अन्य मूल्यांचा नकली नोटा ३,१७,३८४ दशलक्ष इतक्या होत्या. २०२४ मध्ये हे प्रमाण घटून २,२२,६३९ दशलक्षांवर आले आहे.