Join us

सौर संयंत्रामुळे वीज बिल खूप कमी येणार, सरकारकडून बँकेत थेट अनुदान जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:16 IST

Solar Panel : आता नागरिकांना स्वतःहून, कोणत्याही विक्रेत्याद्वारे किंवा कंपनीद्वारे त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसविता येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भातील प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

नवी दिल्ली : आता नागरिकांना स्वतःहून, कोणत्याही विक्रेत्याद्वारे किंवा कंपनीद्वारे त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसविता येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भातील प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

यापूर्वी, 'रूफटॉप' कार्यक्रमांतर्गत, रहिवासी ग्राहकांना अनुदान आणि इतर फायदे मिळविण्यासाठी केवळ ठरवलेल्या विक्रेत्यांमार्फत सौरऊर्जा संयंत्र बसवण्याची परवानगी होती. मात्र, आता सामान्य ग्राहकांना स्वतः किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे सौर संयंत्र बसवता येणार आहे, असे नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यानुसार, लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्याची स्वीकृती आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल तयार केले जाणार आहे.

मंत्रालयाने सांगितले की, वीज वितरण कंपन्यांच्या स्तरावर एकाच स्वरूपात एक पोर्टल असेल आणि दोन्ही पोर्टल एकमेकांशी जोडले जातील. ज्या व्यक्तीला घराच्या छतावर सोलर प्लांट बसवायचा आहे, त्यांनी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा. लाभार्थ्याला बँक खात्याच्या तपशिलासह इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. अनुदानाची रक्कम त्याच खात्यात जमा केली जाईल. 

१५ दिवसांत अर्ज मंजुरी- तांत्रिक मंजुरीसाठी १५ दिवसांत अर्ज वितरण कंपन्यांकडे पाठविला जाईल. ही सर्व माहिती पोर्टलवर पाहायला मिळेल. दर्जेदार सेवा, गुणवत्ता राखण्यासाठी मंत्रालय सूचना जाहीर करणार आहे. - लाभार्थ्याने ठरवून दिलेल्या वेळेत संयंत्रे लावून घेणे आवश्यक असून, असे न केल्याचा त्याचा अर्ज फेटाळला जाईल. पोर्टल तयार करण्याची प्रक्रिया सहा ते आठ आठवड्यांत तयार होईल. याबाबतची सर्व माहिती www.solarrooftop.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

टॅग्स :केंद्र सरकारवीज