Join us
Daily Top 2Weekly Top 5

ते ७२,००० कोटी रुपये तुमचे ! कसे मिळवाल? ‘आरबीआय’चे ‘उद्गम’ पोर्टल आहे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:06 IST

बँकांमध्ये कोट्यवधी रुपये बेवारस पडून; तुमची हक्काची जुनी पुंजी नक्की मिळवा

आपल्या किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या कष्टाची कमाई एखाद्या जुन्या बँक खात्यात बेवारस (अनक्लेम्ड) पडून आहे आणि आपल्याला त्याची पुसटशी कल्पनाही नाही, असे घडू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय बँकांमध्ये तब्बल ७२,४५४ कोटी रुपये बेवारस पडून आहेत. ही रक्कम योग्य वारसदारांना मिळवून देण्यासाठी आता आरबीआयने ‘उद्गम’ (UDGAM) हे विशेष पोर्टल सुरू केले आहे.

ठेवी बेवारस राहण्याची अनेक कारणे आहेत. अनेकदा लोक जुने बँक खाते बंद करायला विसरतात किंवा मुदत ठेव (एफडी) परिपक्व (मॅच्युअर) झाल्यानंतर ती काढली जात नाही. काही प्रकरणांत खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना त्या खात्याची माहिती नसते. सलग १० वर्षे कोणत्याही बँक खात्यात व्यवहार झाले नाहीत, तर त्या खात्यावरील रक्कम बेवारस मानली जाते. ही रक्कम आरबीआयकडून ‘ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी’मध्ये (डीईएएफ) वर्ग केली जाते.

कसा शोधाल तुमचा पैसा?

  • बेवारस खात्यात पडून असलेली तुमची रक्कम शोधण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे :
  • पोर्टलला भेट द्या : https://udgam.rbi.org.in या संकेतस्थळावर जा.
  • नोंदणी करा : मोबाइल नंबर, नाव आणि ओटीपी वापरून आपले अकाउंट तयार करा.
  • सर्च करा : लॉगिन केल्यानंतर आपले नाव, पॅन कार्ड, व्होटर आयडी किंवा पासपोर्ट यापैकी एका माहितीच्या आधारे सर्च करा.
  • दावा करा : जर तुमच्या नावावर रक्कम दिसत असेल, तर संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे (आधार, पॅन, पासबुक इ.) सादर करून तुम्ही ती रक्कम पुन्हा मिळवू शकता.

सर्वाधिक रक्कम कुठे?

बेवारस रकमेच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडिया १९,३२९ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक (६,९१० कोटी) आणि कॅनरा बँक (६,२७८ कोटी) यांचा क्रमांक लागतो. सध्या या पोर्टलवर ३० बँकांचा डेटा उपलब्ध असून, देशातील ९०% अनक्लेम्ड ठेवींचा यात समावेश आहे.

कोणत्या खात्यांतील रक्कम ठरते बेवारस? पुढे काय हाेते?

  • जर बँक खात्यामध्ये सलग १० वर्षे कोणताही व्यवहार झाला नसेल, तर ती रक्कम ‘अनक्लेम्ड’ मानली जाऊ शकते.
  • बचत खाते / चालू खाते : ज्या खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार झाले नाहीत.
  • मुदत ठेव : ज्यांची मुदत संपल्यानंतरही पैसे काढले गेले नाहीत.
  • रिकरिंग डिपॉझिट (आरडी) : आरडी पूर्ण होऊनही पडून असलेली रक्कम.
  • बंद झालेली खाती : ज्या बँक खात्यांमध्ये व्यवहार बंद झाले आहेत आणि शिल्लक रक्कम तशीच राहिली आहे.

पोर्टलवरील प्रमुख सरकारी बँका

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक

पोर्टलवरील प्रमुख खासगी बँका

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, साऊथ इंडियन बँक, धनलक्ष्मी बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, तमिळनाडू मर्कंटाईल बँक, जम्मू अँड काश्मीर बँक

महत्त्वाचे...

  • या पैशावर मूळ खातेदार किंवा त्याचा कायदेशीर वारस कधीही दावा करू शकतो, म्हणूनच ‘उद्गम’ (UDGAM) पोर्टल तयार करण्यात आले आहे.
  • या पोर्टलवर सध्या फक्त तीच रक्कम दिसून येते, जी बँकांनी १० वर्षांनंतर आरबीआयकडे वर्ग केली आहे.
  • असे असले तरी, मूळ खातेदार किंवा त्याचा कायदेशीर वारस कधीही आणि कोणत्याही वेळी बँकेकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी दावा करू शकतो.
English
हिंदी सारांश
Web Title : ₹72,000 Crore unclaimed! RBI's UDGAM portal helps you recover it.

Web Summary : ₹72,454 crore lies unclaimed in Indian banks. RBI's UDGAM portal simplifies finding and claiming this money. Search using name, PAN, or Voter ID after registering on the portal and claim at your bank.
टॅग्स :गुंतवणूक