Join us

टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:39 IST

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या नोएल टाटा यांच्यासोबत एक गट असून, दुसरा गट मेहली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील चार ट्रस्टींचा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टाटा सन्समधील सुमारे ६६% भागधारक असलेल्या टाटा ट्रस्टमधील विश्वस्तांमध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्या व प्रशासकीय मुद्द्यांवरून तीव्र मतभेद झाले आहेत. या उद्योगसमूहातील घडामोडींमुळे उद्योगजगत तसेच समभागधारक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणु श्रीनिवासन, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि ट्रस्टी डेरियस खंबाटा यांनी मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

 रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या नोएल टाटा यांच्यासोबत एक गट असून, दुसरा गट मेहली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील चार ट्रस्टींचा आहे. 

पुनर्नियुक्तीवरून वादटाटा ट्रस्टच्या बैठकीत माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांची संचालकपदी पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यांचे वय ७७ वर्षे झाल्याने, ट्रस्टने अलीकडेच स्वीकारलेल्या धोरणानुसार त्यांची पुनर्नियुक्ती आवश्यक होती.नोएल टाटा आणि वेणु श्रीनिवासन (टीव्हीएस समूहाचे चेअरमन एमेरिटस) यांनी विजय सिंह यांची पुनर्नियुक्ती करावी, असे सुचविले. मात्र, मेहली मिस्त्री, प्रमित झावेरी, जहांगीर एच. सी. जहांगीर आणि डेरियस खंबाटा या चार ट्रस्ट्यांनी प्रस्तावाला विरोध केला आणि तो फेटाळण्यात आला.

मेहली मिस्त्रींच्या निवडीला नोएल टाटांचा विरोधविजय सिंह यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर, चार ट्रस्टींनी मेहली मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळावर निवड करण्याचा प्रस्ताव मांडला.मात्र, नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी त्यास विरोध केला आणि टाटा समूहाच्या मूल्यांशी सुसंगत पारदर्शक प्रक्रियेची आवश्यकता असल्यावर भर दिला. विजय सिंह यांनी स्वखुशीने टाटा सन्सच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. टाटा ट्रस्टची बैठक १० ऑक्टोबर रोजी नियोजित आहे.

आपल्याला दूर  ठेवलेमेहली मिस्त्री यांचे शापूरजी पालोनजी कुटुंबाशी संबंध असून, या कुटुंबाकडे टाटा सन्सचे १८.३७% भागभांडवल आहे. महत्त्वाच्या निर्णयांपासून आपल्याला दूर ठेवले जात असल्याची मिस्त्री यांची तक्रार असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :टाटा